वॉशिंग्टन : अमेरिकेतील एक एनर्जी स्टार्टअप कंपनी जगातील सर्वात मोठी बॅटरी म्हणजेच ऊर्जा साठवणीची जागा बनवणार आहे. ‘फॉर्म एनर्जी’ नावाचे हे स्टार्टअप मेन राज्याच्या लिंकनमध्ये आहे. इतक्या मोठ्या बॅटरीच्या निर्मितीचा उद्देश पॉवर ग्रीडवरील भार कमी करणे हा आहे. या प्रकल्पाला अमेरिकेच्या ऊर्जा विभागाकडून वित्तसहाय्य देण्यात आले आहे.
ऊर्जा साठवणीच्या समस्येवरील अशा समाधानासाठी डिपार्टमेंट ऑफ एनर्जीने 147 दशलक्ष डॉलर्सचे अनुदान दिले आहे. जर सध्याच्या योजनेत परिवर्तन झाले नाही तर या बॅटरीत 8500 मेगावॅट-अवर इलेक्ट्रिसिटी स्टोअर करण्याची क्षमता असेल. फॉर्म एनर्जीचे सीईओ आणि सह-संस्थापक माटेओ जारामिलो यांनी म्हटले आहे की बॅटरी सिस्टीममध्ये जगातील कोणत्याही सिस्टीमच्या तुलनेत अधिक एनर्जी स्टोअर करण्याची क्षमता असेल. सध्या कॅलिफोर्नियातील एडवर्डस आणि सॅनबोर्न सोलर-प्लस-स्टोरेजकडे अशी सर्वाधिक क्षमता आहे. तिथे 3,287 मेगावॅट-अवर स्टोअर करण्यासाठी 1,20,000 पेक्षा अधिक बॅटरींचा वापर होतो. नव्या बॅटरीत 8500 मेगावॅट-अवरची क्षमता आहे. ही ऊर्जा इतकी आहे की त्यापैकी केवळ एक मेगावॅट-अवर एक इलेक्ट्रिक कारला 5800 किलोमीटरपर्यंतचा प्रवास करण्यासाठी पुरेशी ऊर्जा देऊ शकते. जर फॉर्म एनर्जीच्या नव्या बॅटरीला एखाद्या इलेक्ट्रिक कारशी जोडल्याची कल्पना केली तर ही कार पृथ्वीची 1228 वेळा प्रदक्षिणा घालू शकेल किंवा सुमारे 5 कोटी किलोमीटरचा प्रवास करू शकेल. एखाद्या चांगल्या लॅपटॉप बॅटरीची क्षमता सुमारे 65 डब्ल्यूएच असते. याचा अर्थ नवी बॅटरी 13 कोटी पट अधिक इलेक्ट्रिसिटी स्टोअर करू शकते. या नव्या बॅटरी बँकेची निर्मिती फॉर्म एनर्जीच्या नव्या आयर्न-एअर बॅटरी सिस्टीमचा वापर करून बनवले जाईल, जी ‘रिव्हर्सिबल रस्टिंग’च्या प्रक्रियेचा वापर करून काम करते. ही बॅटरी ज्यावेळी डिस्चार्ज होते, त्यावेळी ती हवेतून ऑक्सिजन घेते आणि बॅटरीच्या आत असलेल्या लोखंडाला गंजवते. ज्यावेळी बॅटरी रिचार्ज होते त्यावेळी ही प्रक्रिया उलट होते. हा गंज पुन्हा लोखंडात बदलतो आणि ऑक्सिजन हवेत सोडला जातो.