भोपाळ : मध्य प्रदेशातील पन्ना जिल्हा जगभरात हिर्यांच्या खाणीसाठी प्रसिद्ध आहे. आतापर्यंत तिथे अनेक सामान्य लोकांना हिरे सापडून त्यांची चांदी झाली आहे! आताही पन्ना जिल्ह्यातील जरुआपूर गावातील एका मजुराचे भाग्य असेच फळफळले. खाणीत खोदकाम करीत असताना त्याला तीन हिरे सापडले. या हिर्यांची किंमत अनेक लाखांमध्ये आहे.
जरुआपूरच्या उथळ खाणीत हा सुबल नावाचा मजूर खोदकाम करीत होता. त्यावेळी त्याला एकाच वेळी तीन हिरे सापडले. त्यांचे वजन 4.45, 2.16 आणि 0.93 कॅरेट आहे. हे हिरे उत्तम दर्जाचे आहेत हे विशेष. सुबल खाणीतील दगड व माती पाण्याने साफ करीत असताना त्याला हे हिरे गवसले. सर्वसाधारणपणे एक कॅरेट हिर्याची किंमत पाच लाख रुपये असते. त्यानुसार सुबलला मिळालेल्या हिर्यांची किंमत तीस ते 35 लाख रुपये असू शकते. हे तिन्ही हिरे त्याने हिरा कार्यालयात जमा केले आहेत. त्याची पुष्टी हिरे अधिकारी आर. के. पांडे यांनी केली आहे. नियमानुसार या हिर्यांचा लिलाव केला जाईल व बारा टक्के कर वगळून अन्य 88 टक्के रक्कम या मजुराला दिली जाईल.