टोकियो ः विद्युतपुरवठ्यासाठी तारांचा वापर केला जातो, हे आपल्याला माहिती आहेच. मात्र, बिनतारी वीजवहनही होऊ शकते, हे तुम्हाला माहिती आहे का? तसा एक प्रयोग जपानमध्ये यशस्वी करण्यात आला होता. सूक्ष्मलहरींच्या साहाय्याने अचूक लक्ष्यापर्यंत बिनतारी वीजवहन करण्यात जपानमधील एका संशोधकाला यश आले होते. त्यामुळे भविष्यात अणू, औष्णिक तसेच जलविद्युत प्रकल्पांइतकीच पुरेशी वीज तयार करता येईल, अशी अपेक्षा संशोधकांनी व्यक्त केली होती.
55 मीटर लांब अंतरावरील वीजसंचात सूक्ष्मलहरींच्या मदतीने 1.8 किलोवॅट इतक्या क्षमतेचे वीजवहन अगदी अचूक पद्धतीने करण्यात संशोधकांना यश आले. सूक्ष्मलहरींचे थेट वीजप्रवाहात रूपांतर करण्यात आले. पश्चिम जपानमधील ह्योगो येथे हा प्रयोग झाला. उच्च क्षमतेच्या सूक्ष्म लहरींना तारांचा वापर न करता त्या छोट्या लक्ष्यापर्यंत पोहोचवण्याचा जगातील हा पहिलाच प्रयोग होता.अवकाशातील संशोधनासाठी सूर्यकिरणांपासून मिळणारी वीज वापरली जाते. यात भूस्थानक कक्षेत सौरऊर्जा एकत्रित करून नंतर तिचे पृथ्वीवरील वीजसंचात वहन केले जाते.
या प्रयोगाने सौरऊर्जा निर्मितीचे स्वप्न सत्यात उतरू शकते, असा विश्वास संशोधकांनी व्यक्त केलेला आहे. पृथ्वीवरील सौरऊर्जा पटलांना काही मर्यादा असतात; परंतु कृत्रिम उपगृहावर आधारित सौरऊर्जा पटलांना हवामान बदलांमुळे कोणतीही अडचण येत नाही. अशी पटले 24 तास वीज संचय करत असतात. हा प्रयोग अंमलात आणायचा झाल्यास पृथ्वीपासून अंदाजे 35 हजार किलोमीटर अंतरावर वीजसंचय कक्ष बसवून सूक्ष्मलहरींच्या साहाय्याने सौरऊर्जेचे वहन करणे शक्य होईल, अशीही माहिती संशोधकांच्या एका गटाने दिली. याशिवाय उर्जेचीही समस्या सुटण्यास मदत होणार असल्याचे संशोधकांनी सांगितले.