

न्यूयॉर्क : ‘रोज एक सफरचंद खा आणि डॉक्टरांना दूर ठेवा,’ ही म्हण आपण लहानपणापासून ऐकत आलो आहोत. पण या साध्या दिसणार्या फळात खरोखरच इतकी ताकद आहे का? उत्तर आहे, ‘हो’. जगभरातील विविध संशोधनांमधून आता हे सिद्ध झाले आहे की, सफरचंद केवळ एक चविष्ट फळ नाही, तर ते आरोग्यदायी पोषक तत्त्वांचा खजिना आहे, जो आपल्याला अनेक गंभीर आजारांपासून वाचवू शकतो.
सफरचंदाच्या प्रत्येक घासात अनेक शक्तिशाली संयुगे दडलेली आहेत. यातील काही प्रमुख घटक असे... पॉलिफेनॉल : सफरचंदाच्या सालीला लाल रंग देणारे ‘अँथोसायनिन’ हे एक प्रकारचे पॉलिफेनॉल आहे, जे थेट हृदयाच्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरते. याशिवाय ‘फ्लोरिडझिन’ नावाचा घटक रक्तातील साखर नियंत्रणात ठेवण्यास मदत करतो. पेक्टिन फायबर : सफरचंदात पेक्टिन नावाचे विरघळणारे फायबर भरपूर प्रमाणात असते. हे फायबर रक्तातील वाईट कोलेस्ट्रॉल कमी करते. इतकेच नाही, तर ते अन्नातून साखर आणि चरबी शोषण्याची प्रक्रिया मंदावते, ज्यामुळे रक्तातील साखरेची पातळी अचानक वाढत नाही.
2017 मध्ये प्रसिद्ध झालेल्या एका अहवालानुसार, नियमित सफरचंद खाणार्यांमध्ये टाईप 2 मधुमेह होण्याचा धोका तब्बल 18टक्केने कमी होतो. 2022 मध्ये 18 अभ्यासांचे विश्लेषण करून काढलेल्या निष्कर्षानुसार, एका आठवड्यापेक्षा जास्त काळ नियमितपणे सफरचंद किंवा त्याचा रस सेवन केल्यास कोलेस्ट्रॉलची पातळी कमी होण्यास मदत होते. तज्ज्ञांच्या मते, आरोग्यदायी आहारात सफरचंदासारख्या फळांचा समावेश केल्यास कर्करोगाचा धोका 40टक्क्यांपर्यंत कमी होऊ शकतो.
यामागे सफरचंदात असलेले बायोअॅक्टिव्ह संयुगे आणि फायटोकेमिकल्स आहेत. अमेरिकेतील मिडल टेनेसी स्टेट युनिव्हर्सिटीच्या प्राध्यापिका जेनेट कोलसन एक संतुलित मत मांडतात. त्या म्हणतात, ‘हे खरं आहे की सफरचंदात व्हिटॅमिन सी किंवा कॅल्शियमसारखी जीवनसत्त्वे जास्त नसतात. पण त्यात इतर अनेक सूक्ष्म पोषक तत्त्वे आहेत, जी शरीरासाठी अत्यंत फायदेशीर ठरतात आणि आरोग्याला प्रोत्साहन देतात.