Janmashtami 2024 : एकावर एक सात थरांचा मानवी मनोरा!
बाली : सोशल मीडियावरील अनेक व्हिडीओ अतिशय गमतीदार असतात तर काही व्हिडीओ अनाहूत धक्के देऊन जातात. सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत असून यामुळे अगदी श्वास रोखून धरावा लागेल, इतका तो रोमांचक आहे. या व्हिडीओमध्ये काही मुले स्टंटसाठी एकमेकांवर उभी राहून मानवी मनोरा रचत असल्याचे दिसत आहे.
श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या वेळी महाराष्ट्रात दहीहंडीचा कार्यक्रम आयोजित केला जातो. या कार्यक्रमासाठी उंचच उंच मानवी मनोरे रचले जातात, हेही सर्वाना ज्ञात आहे. यामध्ये अनेक बाळ गोपाळ मनोरे बनवून एकमेकांवर चढतात आणि वरच्या बाजूला असलेला गोपाळ हंडी फोडतो. परंतु या व्हिडीओमध्ये दिसणारी मुले भारतातील नसून इतर देशातील आहेत. मिळालेल्या माहितीनुसार ही मुले इंडोनेशियातील आहेत. काही इंडोनेशियन प्रथा किंवा सण साजरे करण्यासाठी ते एकमेकांवर उभे राहतात आणि मानवी मनोरा रचतात.
अगदी आपल्या दहीहंडीप्रमाणे ही प्रथा आहे. परंतु व्हिडीओमध्ये दिसून येते, त्यानुसार या मुलांनी दहीहंडीमध्ये जसा आपल्याकडे पिरॅमिड बनवला जातो तसा नाही तर खांबाप्रमाणे एकमेकांच्या वर चढून मानवी मनोरा बनवला आहे. काही सेकंदाच्या या व्हिडीओमध्ये जे काही दिसते, ते थक्क करणारे आहे. केवळ एकेरी स्वरुपाचा हा मनोरा असल्याने वरील बाजूचे मुले कोसळतात की काय, अशीही भीती वाटणे रास्त होते, पण या मुलांनी खूप सराव केल्यानंतर हा मनोरा रचला असावा असे त्यांच्या तयारीवरून दिसते. जेवढ्या कौशल्याने त्यांनी मानवी मनोरा उभा केला तेवढ्यात कौशल्याने त्यांनी तो उतरवला देखील, असे या व्हिडीओेत दिसून येते. खाली उतरताना ते नियंत्रणाबाहेर जात नाही आणि हळूहळू एक एक जण खाली बसतो आणि अखेरीस शेवटच्या मुलाला देखील खाली उतरवले जाते. या व्हिडीओने लोकांना श्वास रोखून धरण्यास प्रवृत्त केले आहे.