

न्यूयॉर्क : युनिव्हर्सल प्रकार ‘ओ’ (Universal Type O) मध्ये रूपांतरित केलेल्या ‘ए’ रक्तगटाच्या किडनीचे पहिले यशस्वी मानवी प्रत्यारोपण नुकतेच करण्यात आले आहे. युनिव्हर्सिटी ऑफ बिटिश कोलंबिया येथे विकसित केलेल्या विशेष एन्झाईमचा वापर यासाठी करण्यात आला. हे एन्झाईम अवयवाचा न जुळणारा रक्तगट आणि अवयव नाकारला जाण्याची शक्यता टाळण्यास मदत करतात. ‘नेचर बायोमेडिकल इंजिनिअरिंग’मध्ये प्रकाशित झालेली ही मोठी कामगिरी, हजारो रुग्णांना किडनी प्रत्यारोपण लवकर मिळवून देण्यासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल ठरली आहे.मनुष्य-देहातील पहिल्या-वहिल्या प्रयोगात, एन्झाईम-रूपांतरित किडनी एका ब्रेन-डेड प्राप्तकर्त्यामध्ये कुटुंबाच्या संमतीने प्रत्यारोपित करण्यात आली. यामुळे संशोधकांना मानवी जीवन धोक्यात न आणता रोगप्रतिकार शक्तीच्या प्रतिसादाचे निरीक्षण करणे शक्य झाले.
दोन दिवसांपर्यंत या किडनीने अवयव नाकारण्याची तीव्र प्रतिक्रिया न दर्शवता कार्य केले. तीव्र प्रतिक्रिया म्हणजे, एका मिनिटांत विसंगत अवयव नष्ट करू शकणारी जलद रोगप्रतिकार प्रतिक्रिया. तिसर्या दिवशी, काही रक्तगट निर्देशक पुन्हा दिसू लागले, ज्यामुळे सौम्य प्रतिक्रिया झाली, परंतु नुकसान सामान्य विसंगतीच्या तुलनेत खूपच कमी होते आणि शरीरात अवयव सहन करण्याची प्रक्रिया सुरू झाल्याचे संकेत संशोधकांना दिसले. ‘मानवी मॉडेलमध्ये हे घडताना पाहण्याची ही पहिलीच वेळ आहे,’ असे डॉ. स्टीफन विथर्स म्हणाले, जे रसायनशास्त्राचे UBC प्रोफेसर एमेरिटस आहेत आणि त्यांनी एन्झाईमच्या विकासाचे सह-नेतृत्व केले. ‘हे आम्हाला दीर्घकालीन परिणाम सुधारण्यासाठी अमूल्य अंतर्द़ृष्टी देते.’
हा शोध दहा वर्षांहून अधिक कामाचा परिणाम आहे. 2010 च्या सुरुवातीस, डॉ. विथर्स आणि त्यांचे सहकारी डॉ. जयचंद्रन किझाक्केडथु यांनी रक्तगट निश्चित करणार्या साखरेचे रेणू (sugars) काढून टाकून ‘युनिव्हर्सल डोनर ब्लड’ (सार्वत्रिक रक्तदाता रक्त) बनवण्यावर लक्ष केंद्रित केले होते. हेच साखरेचे रेणू किंवा अँटीजेन्स (Antigens) अवयवाच्या रक्तवाहिन्यांना आच्छादित करतात. प्राप्तकर्त्याच्या रोगप्रतिकार प्रणालीला चुकीचा अँटीजेन आढळल्यास, ती अवयवावर हल्ला करते. किडनी प्रत्यारोपणाच्या प्रतीक्षा यादीतील अर्ध्याहून अधिक असलेले ‘ओ’ रक्तगटाचे रुग्ण फक्त ‘ओ’ रक्तगटाचे अवयवच स्वीकारू शकतात, परंतु ‘ओ’ किडनी इतरांना दिली जाते कारण ती सार्वत्रिकपणे सुसंगत (Universally Compatible) असते. यामुळे, ‘ओ’ रक्तगटाच्या रुग्णांना दोन ते चार वर्षे जास्त वाट पाहावी लागते आणि अनेक जण वाट पाहताना दगावतात.
2019 मध्ये UBC टीमने शोधलेले दोन अत्यंत कार्यक्षम एन्झाईम हे या द़ृष्टिकोनाची गुरुकिल्ली आहेत. हे एन्झाईम ‘ए’ रक्तगट निश्चित करणारी साखर काढून टाकतात, प्रभावीपणे त्याचे ‘ओ’ प्रकारात रूपांतर करतात. डॉ. विथर्स सांगतात की, रक्तगटाचे अँटीजेन्स पेशींवर ‘नेमटॅग’ प्रमाणे कार्य करतात आणि UBC एन्झाईम ‘मॉलिक्युलर सिझर्स’ (आण्विक कात्री) म्हणून काम करतात, ‘ए’ प्रकाराला चिन्हांकित करणारा ‘नेमटॅग’ कापून टाकतात आणि खाली दडलेला ‘ओ’ प्रकार उघड करतात. यापूर्वी शरीराबाहेर रक्त, फुफ्फुसे आणि किडनीवर (केंबि—ज विद्यापीठासह) यशस्वी चाचण्या झाल्यानंतर, ‘एन्झाईम-रूपांतरित अवयव मानवी रोगप्रतिकार प्रणालीमध्ये टिकू शकतो का?’ हा प्रश्न उरला होता.2023 च्या उत्तरार्धात या प्रश्वाचे उत्तर मिळाले. ‘आमच्या सहकार्यांनी मला त्यांचे डेटा दाखवले, जिथे त्यांनी आमच्या एन्झाईमचा वापर करून मानवी किडनी रूपांतरित केली आणि ब्रेन-डेड प्राप्तकर्त्यामध्ये प्रत्यारोपित केली होती. ती अत्यंत चांगल्या प्रकारे कार्य करत होती,’ डॉ. किझाक्केडथु म्हणाले. हा शोध किडनी प्रत्यारोपणाच्या जगात गेम-चेंजर ठरू शकतो, ज्यामुळे ‘ओ’ रक्तगटाच्या रुग्णांसाठी आशेचा किरण निर्माण झाला आहे.
प्रत्यारोपणातील रक्तगट विसंगतीवर मात करण्याच्या पारंपारिक पद्धतींमध्ये प्राप्तकर्त्याच्या रोगप्रतिकार प्रणालीला दडपण्यासाठी आणि अँटीबॉडीज काढून टाकण्यासाठी दिवसांचा सघन उपचार आवश्यक असतो आणि यासाठी जिवंत दात्यांकडून अवयव लागतात. परंतु, या नवीन दृष्टिकोनात रुग्णाऐवजी अवयवामध्येच बदल केला जातो. याचा अर्थ असा की प्रत्यारोपण जलद, कमी गुंतागुंतीत केले जाऊ शकते आणि प्रथमच मृत दात्यांकडून रक्तगट न जुळणारे अवयव वापरणे शक्य होईल जिथे प्रत्येक तास रुग्णाचे जीवन आणि मृत्यू ठरवू शकतो.