

न्यूयॉर्क : 2007 मध्ये, शास्त्रज्ञांनी एका नवीन प्रकारच्या बायोकेमिस्ट्रीचा शोधनिबंध प्रकाशित केला, ज्यामध्ये त्यांनी सजीवांमध्ये रिअल टाईममध्ये काय घडत आहे हे पाहण्याची पद्धत सांगितली. कॅलिफोर्निया विद्यापीठ, बर्कले येथील बायोकेमिस्ट कॅरोलिन बर्टोझी आणि त्यांच्या संशोधन प्रयोगशाळेने पेशींच्या पृष्ठभागावर असलेल्या ग्लायकन्स या विशेष कर्बोदक रेणूंचे व्हिज्युअलायझेशन करण्यासाठी अनेक वर्षे खर्च केली होती.
ग्लायकन्स हे बायोमॉलिक्यूल्सच्या तीन प्रमुख वर्गांपैकी एक आहेत (प्रथिने आणि न्यूक्लिक अॅसिडसह). त्यांचा संबंध दाह आणि रोगांशी जोडला गेला आहे. परंतु, शास्त्रज्ञांना ते व्हिज्युअलाईझ करणे कठीण वाटत होते. हे करण्यासाठी, बर्टोझी यांनी स्क्रिप्स रिसर्चचे के. बॅरी शार्पलेस आणि कोपनहेगन विद्यापीठाचे मॉर्तेन मेल्डल यांनी विकसित केलेल्या रासायनिक द़ृष्टिकोनाचा आधार घेतला. शार्पलेस यांनी ‘क्लिक केमिस्ट्री’ची कल्पना मांडली होती - ज्यात लहान उप-युनिट्स एकत्र जोडून जटिल जैविक रेणू त्वरित तयार करता येतात.
जैविक रेणूंमध्ये अनेकदा बंध असलेल्या कार्बन अणूंचे कंकाल असतात. परंतु, कार्बन अणू सहजपणे जोडले जात नाहीत. याचा अर्थ असा की, पूर्वीच्या काळात रसायनशास्त्रज्ञांना अनेक एन्झाईम्स वापरून, कष्टप्रद आणि अनेक-टप्प्यांच्या प्रक्रियांचा वापर करावा लागत होता, ज्यामुळे नको असलेले उप-उत्पादने तयार होत असत. हे प्रयोगशाळेसाठी ठीक होते; पण औषधांसाठी मोठ्या प्रमाणात बायोमॉलिक्यूल्स तयार करण्यासाठी ते योग्य नव्हते.
शार्पलेस यांना जाणवले की, जर ते साधे रेणू एकत्र जोडू शकले, ज्यांच्याकडे आधीच पूर्ण कार्बन फ्रेम आहे, तर तेही प्रक्रिया सोपी आणि मोठ्या प्रमाणावर करू शकतील. त्यांना फक्त एका जलद, शक्तिशाली आणि विश्वासार्ह कनेक्टरची आवश्यकता होती. स्वतंत्रपणे, शार्पलेस आणि मेल्डल यांना महत्त्वाचा कनेक्टर सापडला : एझाईड आणि अल्काईन या संयुगांमधील रासायनिक अभिक्रिया. यातील युक्ती उत्प्रेरक म्हणून कॉपर धातूचा वापर करण्याची होती. बर्टोझी यांच्या संशोधनाने या तंत्राला जीवित पेशींसाठी सुरक्षित बनवले.