वॉशिंग्टन : मधुमेहाबाबत सातत्याने संशोधन होत असते. रक्तातील शर्करेचे ऊर्जेत रूपांतर करण्याचे काम शरीरातील इन्सुलिन करीत असते. याबाबतही एक अनोखे संशोधन झालेले आहे. मॅसॅच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (एमआयटी) या संस्थेच्या वैज्ञानिकांनी मधुमेहावर गुणकारी ठरणारा इन्सुलिनचा नवा प्रकार (स्मार्ट इन्सुलिन) तयार केला आहे.
हे नव्या प्रकारचे इन्सुलिन रक्तात 10 तास फिरत राहते व जेव्हा रक्तातील साखर जास्त होईल तेव्हाच क्रियाशील होते त्यामुळे मधुमेहाच्या रुग्णाला अचानक काही होण्याची शक्यता खूपच कमी होते. त्यामुळे रुग्णांना वारंवार रक्तातील साखर तपासण्याची गरज भासणार नाही व रोज इन्सुलिनची इंजेक्शन्स घ्यावी लागणार नाहीत, असे एमआयटीच्या संशोधकांनी म्हटले. टाईप 1 मधुमेहात स्वादुपिंडातून इन्सुलिनची निर्मिती होत नाही. त्यामुळे चयापचयाची क्रिया बिघडते, याचे कारण म्हणजे स्नायू व मेद ऊती या रक्तातील ग्लुकोज शोषून घेत असतात. इन्सुलिनच्या इंजेक्शनने या रुग्णांना बरे वाटते. रुग्णांनी इन्सुलिन किती घ्यायचे हे रक्तातील साखर किती आहे त्यांनी कर्बोदके किती सेवन केली आहेत, हे पाहून घ्यावे लागते. एमआयटीच्या वैज्ञानिकांनी बनवलेले स्मार्ट इन्सुलिन रक्तात साखरेचे प्रमाण वाढते तेव्हाच क्रियाशील होते. त्यामुळे रुग्णाच्या रक्तातील साखर कमी होण्याने होणारे मृत्यू टळतात.
रक्तातील साखर कमी होण्याला हायपोग्लायसिमिया म्हणतात. त्यात रुग्णाचा मृत्यू होऊ शकते. ग्लुकोज नेमके किती आहे ते पाहून प्रतिसाद देणारे हे इन्सुलिन असून, संशोधकांनी इन्सुलिनमध्ये हायड्रोफोबिक रेणूचा समावेश केला. हा रेणू म्हणजे मेद रेणूंची एक साखळी असते. त्यामुळे इन्सुलिन रक्तप्रवाहात फिरत राहते. संशोधकांनी त्यात पीबीए नावाचे रसायनही टाकले ते ग्लुकोजला विरुद्ध बाजूने बांधू शकते. ज्यावेळी ग्लुकोजचे प्रमाण जास्त असते तेव्हा साखर इन्सुलिनला चिकटते व त्यामुळे इन्सुलिन रक्तातील जागा साखर शोषून घेते. इन्सुलिनला ग्लुकोज नियंत्रणात प्रभावी करण्यासाठी चार प्रकारचे रेणू शोधून काढण्यात आले आहेत. त्यात फ्लोरिन व नायट्रोजनच्या अणूंचा समावेश आहे. हे रासायनिक रेणूंचे प्रकार नंतर नेहमीच्या इन्सुलिनबरोबर वापरण्यात आले. त्यात उंदरांमध्ये साखरेच्या प्रमाणाला संपूर्ण 10 तासांत प्रतिसाद देऊन त्याचे नियंत्रण करण्यात आले. पीबीए रेणू हा फ्लोरिन बरोबर जास्त चांगले काम करतो व ज्या उंदरांना त्या प्रकारचा फ्लोरिनयुक्त रेणू असलेले इन्सुलिन दिले त्यांच्यात ग्लुकोजच्या वाढत्या प्रमाणास जलद प्रतिसाद मिळाला.