लंडन : मानवी मूत्राच्या मदतीने मोबाईल चार्ज करण्याची पद्धत जगात प्रथमच ब्रिटनच्या वैज्ञानिकांनी शोधून काढलेली आहे. ब्रिस्टॉल रोबोटिक लॅबोरेटरीत काम करणार्या वैज्ञानिकांनी मानवी मूत्रापासून वीज निर्मिती करून नंतर त्यापासून मोबाईल चार्ज करण्यात हे यश मिळवले. ब्रिस्टॉल येथील वेस्ट ऑफ इंग्लंड विद्यापीठातील डॉ. लोआनिस लेरोपॉलस यांनी सांगितले की, मानवी मूत्रापासून मोबाईल चार्जिंगची पद्धत आम्ही जगात प्रथमच विकसित केली याचा आनंद आहे. शरीरातून बाहेर टाकल्या जाणार्या त्याज्य पदार्थापासून अशा प्रकारे ऊर्जा निर्मिती करण्याचे काम कुणी केले नव्हते. त्यामुळे पर्यावरणालाही फायदा होणार आहे.
मानवी मूत्राचा पुरवठा अखंड मिळू शकतो. यात मानवी मूत्र हे अनेक मायक्रोबियल फ्युअल सेल्स म्हणजे सूक्ष्मजीव इंधन घटातून सोडले जाते. त्यातून वीज निर्मिती होते. या इंधनघटाचे वैशिष्ट? म्हणजे यातील स्रोत हा सूर्य किंवा वारा यासारखा नैसर्गिक नाही. त्यामुळे कधी सूर्यप्रकाश मिळाला कधी मिळाला नाही, कधी वारा आहे, कधी नाही या निसर्गाच्या लहरीपणावर काहीही अवलंबून नाही. आम्ही मानवी शरीरातून बाहेर टाकला गेलेला पदार्थच मोबाईल चार्जिंगसाठी वापरत आहोत. याच्या मदतीने चार्जिंग केलेल्या फोनवरून एसएमएस पाठवणे, वेब ब्राऊजिंग, छोटे फोन कॉल करता येतात. मोबाईलवरून आपण जेव्हा फोन करतो त्यावेळी जास्तीत जास्त ऊर्जा वापरली जात असते. परंतु, या बॅटरीच्या मदतीने मोबाईल जास्त काळ चार्जिंग टिकेल अशा पद्धतीने चार्ज करता येतो. वैज्ञानिकांचे असे म्हणणे आहे की, हे संशोधन भविष्यकाळात अधिक उपयोगी ठरू शकेल. घरातील स्नानगृहात जर ते लावले, तर मानवी मूत्र गोळा करून त्याच्यापासून वीज निर्मिती केली जाईल व त्यावर मोबाईल फोन, रेझर, शॉवर चालवता येऊ शकतात. केमेस्ट्री जर्नल ऑफ फिजिकल केमेस्ट्री केमिकल फिजिक्स या नियतकालिकात हे संशोधन प्रसिद्ध झालेले आहे. मायक्रोबियस फ्युअल सेल (एमएफसी) हा सेंद्रिय पदार्थातील ऊर्जेचे रूपांतर हे विजेत करतो, त्यात सूक्ष्मजीवांच्या चयापचयाचा वापर केला जात असतो, असे संशोधकांचे म्हणणे आहे. विद्युत ऊर्जा हे यात सूक्ष्मजीवांच्या नैसर्गिक चक्रात निर्माण होणारे उपउत्पादन आहे. हे सूक्ष्मजीव मानवी मूत्र खातात व त्यामुळे जास्त ऊर्जा निर्मिती बराच काळ करीत राहतात. या इंधन घटातून मिळणारी वीज तुलनेने कमी प्रमाणात असली तरी ती संधारित्रात साठवून चार्जिंग करणे शक्य होते.