

वॉशिंग्टन : अलास्कातील कायम गोठलेल्या स्थितीत असलेल्या जमिनीमध्ये (पर्माफ्रॉस्ट) खोलवर खोदलेल्या एका लष्करी बोगद्याच्या आतून प्राचीन जीवन पुन्हा ‘जिवंत’ करण्यात आले आहे. या गोठलेल्या मातीतून मिळालेले सूक्ष्मजीव सुमारे 40,000 वर्षांपासून येथे नैसर्गिकरित्या कैद केले गेले होते. आता त्यांना पुन्हा जागृत करण्यात आले आहे.
या अभ्यासादरम्यान युनिव्हर्सिटी ऑफ कोलोरॅडो बोल्डर येथे पीएचडीचे विद्यार्थी असलेले सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ आणि भू-रसायनशास्त्रज्ञ ट्रिस्टन कॅरो म्हणतात, ‘हे नमुने कोणत्याही परिस्थितीत मृत नाहीत. ते आजही सक्रिय जीवन धारण करण्यास पूर्णपणे सक्षम आहेत, जे सेंद्रिय पदार्थांचे विघटन करून तो कार्बन डायऑक्साइडच्या रूपात वातावरणात सोडू शकतात.’ कॅरो आणि त्यांच्या सहकार्यांनी केवळ उत्सुकतेपोटी या प्राचीन सूक्ष्मजीवांना जिवंत केलेले नाही. आपल्या जीवाश्म इंधनाच्या वापरामुळे जग अधिक गरम होत असताना, आर्क्टिकमधील परमाफ्रॉस्ट म्हणजेच उत्तर गोलार्धाच्या जवळपास एक चतुर्थांश भूभागाखालील गोठलेली माती, बर्फ आणि खडकांचा थंड भाग वितळत आहे आणि त्यामध्ये साठवलेले हरितगृह वायू बाहेर पडत आहेत.
जसजसे हे थर वितळतील, तसतसे अनेक सूक्ष्मजीव जिवंत होतील. त्यांच्या वाढलेल्या भुकेने ते त्यांच्या सभोवतालच्या सडणार्या पदार्थांचे सेवन करतील. या प्रक्रियेतून वातावरणात अधिक मिथेन आणि कार्बन डायऑक्साइड वायू बाहेर पडेल, ज्यामुळे हवामान बदलांना आणखी हातभार लागेल. भू-सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ सेबॅस्टियन कॉप म्हणतात, ‘हवामानावर होणार्या परिणामांमध्ये ही एक सर्वात मोठी अज्ञात गोष्ट आहे. या गोठलेल्या जमिनीमध्ये मोठ्या प्रमाणात कार्बन साठवलेला आहे, तो वितळल्यास या प्रदेशांच्या पर्यावरणावर आणि हवामान बदलाच्या दरावर कसा परिणाम होईल?’
संशोधकांनी यू. एस. आर्मी कॉर्प्स ऑफ इंजिनियर्सच्या ‘पर्माफ्रॉस्ट टनेल रिसर्च फॅसिलिटी’मधून शंभर मीटरपेक्षा अधिक खोलीवरील गोठलेले नमुने गोळा केले. प्रयोगशाळेत त्यांनी हवामान बदलामुळे अलास्कातील उन्हाळ्याच्या परिस्थितीचे अनुकरण करत, सूक्ष्मजीवांना 390ऋ (3.80उ) आणि 540ऋ (12.20उ) या थंड तापमानावर वाढवले. सुरुवातीला, हे सूक्ष्मजीव अतिशय हळू गतीने वाढत होते. काही प्रकारच्या प्रजाती दररोज केवळ 1,00,000 पेशींमागे फक्त एका पेशीची जागा घेत होत्या. या तुलनेत, प्रयोगशाळेत वाढवल्या जाणार्या बहुतेक जीवाणूंचे प्रकार काही तासांतच त्यांच्या संपूर्ण वसाहतीची जागा घेतात. मात्र, सहा महिन्यांनंतर, पर्माफ्रॉस्टमधील हे सूक्ष्मजीव अचानक सक्रिय झाले, जणू काही ते त्यांच्या गोठलेल्या अंथरुणातून बाहेर पडण्यास तयार झाले. याचा अर्थ असा होतो की, पर्माफ्रॉस्ट वितळवणार्या उष्णतेच्या काळानंतर, सूक्ष्मजीव मोठ्या प्रमाणात हरितगृह वायू उत्सर्जित करण्यास सुरुवात करण्यापूर्वी काही विलंब होऊ शकतो. यावरून हे देखील सूचित होते की, आर्क्टिकमधील उन्हाळा जितका मोठा आणि गरम असेल, तितका मानवांमध्ये आणि सूक्ष्मजीवांमध्ये धोकादायक उत्सर्जन फीडबॅक लूप निर्माण होण्याचा धोका वाढतो.