

नवी दिल्ली : मानवी मेंदू अर्थात ब्रेनमधील कचरा साफ करण्याच्या नैसर्गिक प्रक्रियेत अडथळा निर्माण झाल्यास विस्मरण (डिमेन्शिया) होण्याचा धोका मोठ्या प्रमाणात वाढतो, असा निष्कर्ष एका नवीन वैज्ञानिक अभ्यासात काढण्यात आला आहे. संशोधकांनी स्पष्ट केले आहे की, मेंदूतील अपायकारक पदार्थ आणि प्रोटीन वेळेवर निघून न गेल्यास मेंदूच्या पेशींवर दुष्परिणाम होतो आणि स्मरणशक्ती कमी होण्यास सुरुवात होते.
मेंदूची ‘वेस्ट क्लिअरन्स’ प्रणाली म्हणजेच मेंदूतील कचरा आणि अपायकारक प्रोटीन बाहेर टाकण्याची नैसर्गिक यंत्रणा. ही मेंदूच्या आरोग्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. या प्रक्रियेत अडथळा आल्यास, मेंदूतील हानिकारक पदार्थ साठू लागतात. यामुळे मेंदूच्या पेशींमध्ये सूज, नुकसान आणि अखेरीस विस्मरणासारखे आजार उद्भवू शकतात. संशोधनात असेही आढळले की, खराब झोप आणि हृदयविकाराच्या जोखमीमुळे मेंदूतील कचरा साफ होण्याची प्रक्रिया आणखी मंदावते, ज्यामुळे विस्मरणाचा धोका वाढतो.
नियमित आणि गाढ झोप, तसेच हृदयाचे आरोग्य राखणे, हे मेंदूच्या कचरा साफसफाईसाठी आवश्यक आहे. मेंदूतील कचरा वेळेवर निघून न गेल्यास अल्झायमर आणि इतर डिमेन्शिया प्रकार वाढू शकतात, असे वैज्ञानिकांचे निरीक्षण आहे. स्मरणशक्ती टिकवण्यासाठी झोपेची काळजी घ्या. झोपेच्या सवयी सुधाराव्यात, हृदयाचे आरोग्य राखावे आणि तणाव टाळावा, असा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे. मेंदूच्या आरोग्यासाठी योग्य जीवनशैली, संतुलित आहार आणि नियमित व्यायाम यांचा अवलंब करावा. नवीन संशोधनामुळे डिमेन्शियाच्या कारणांमध्ये मेंदूतील कचरा साफसफाईची प्रक्रिया किती महत्त्वाची आहे, हे अधोरेखित झाले आहे. त्यामुळे आरोग्यदायी जीवनशैली आणि झोपेची गुणवत्ता राखणे, हे विस्मरण टाळण्यासाठी अत्यावश्यक आहे.