वॉशिंग्टन : पृथ्वीशिवाय अन्य खगोलांवर पाणी आहे का याचा सातत्याने शोध घेतला जात असतो. केवळ पाणीच नव्हे तर पर्यायाने अन्यत्र जीवसृष्टीचे अस्तित्व आहे का, याचाही शोध घेण्यात येत आहे. आता याच उद्देशासाठी आपल्या सौरमालिकेतील सर्वात मोठा ग्रह असलेल्या गुरुचा एक चंद्र ‘युरोपा’कडे ‘नासा’चे यान रवाना झाले आहे. सोमवारी ही ‘युरोपा क्लिपर’ मोहीम सुरू झाली. युरोपा या गुरुच्या चंद्रावर बर्फाच्या आवरणाखाली द्रवरूप पाण्याचा महासागर असल्याचे मानले जाते.
‘नासा’ने म्हटले आहे की फ्लोरिडाच्या केप कॅनावरल येथून शक्तिशाली स्पेस एक्स फाल्कन हेवी रॉकेटवर स्वार होऊन ‘युरोपा क्लिपर’ यान सोमवारी, 14 ऑक्टोबरला रवाना झाले. या यानाबरोबर नऊ वैज्ञानिक उपकरणे जोडलेली आहेत. युरोपा क्लिपर हे यान साडे पाच वर्षांमध्ये 2.9 अब्ज किलोमीटरचा प्रवास करून 2030 मध्ये गुरुच्या कक्षेत प्रवेश करील. ‘नासा’चे अधिकारी जीना डिब्रॅकियो यांनी अलीकडेच म्हटले होते की पृथ्वीशिवाय अन्यत्र जीवसृष्टी शोधण्यासाठी गुरुचा ‘युरोपा’ नावाचा चंद्र सर्वाधिक आशादायक खगोल आहे. अर्थात या मोहिमेत थेटपणे जीवसृष्टीचाच शोध घेतला जाणार नाही, पण युरोपावर जीवसृष्टीला अनुकूल कोणते घटक आहेत, हे पाहिले जाईल. युरोपा क्लिपर कार्यक्रमाचे वैज्ञानिक कर्ट नीबर यांनी सांगितले की मंगळ ग्रह अब्जावधी वर्षांपूर्वी राहण्यास योग्य असा ग्रह होता. मात्र युरोपा असा खगोल आहे जो आजही राहण्यास योग्य ठरू शकतो! युरोपाबाबतची माहिती विज्ञानाला सन 1610 पासूनच होती. यापूर्वी 1979 मध्ये व्होएजर यानाद्वारे त्याची काही जवळून छायाचित्रे टिपण्यात आली होती. त्यावेळी त्याच्या पृष्ठभागावर काही रहस्यमय लाल रेषा दिसून आल्या होत्या. 1990 च्या दशकातही युरोपाबाबत संशोधन झाले होते व या चंद्रावर महासागराचे अस्तित्व असावे, असे त्यामधून स्पष्ट झाले होते. आता युरोपाच्या दिशेने रवाना झालेल्या युरोपा क्लिपर यानामध्ये चंद्राचे चुंबकीय बल मोजण्यासाठी कॅमेरे, एक स्पेक्ट्रोग्राफ, रडार आणि एक मॅग्नेटोमीटर यांच्यासह अन्य काही अद्ययावत उपकरणे आहेत. या चंद्रावर पाणी, ऊर्जा व काही विशिष्ट रासायनिक घटक आहेत का हे त्यांच्या सहाय्याने तपासले जाईल. त्याआधारे तिथे सूक्ष्म जीवांच्या स्वरूपात का होईना जीवसृष्टीचे अस्तित्व आहे का हे निष्पन्न होऊ शकेल.