

एडमनसन (टेक्सास) : टेक्सससच्या ग्रामीण भागात एका घराजवळील शेतात आकाशातून एक कारच्या आकाराची वस्तू कोसळली. प्रत्यक्षात ते नासाचे वैज्ञानिक उपकरण असल्याचे स्पष्ट झाले. अॅन वॉल्टर यांनी गुरुवारी सकाळी आकाशात एक मोठी, कारच्या आकाराएवढी वस्तू तरंगताना पाहिली. काही क्षणांत ती वस्तू त्यांच्या शेजार्याच्या गव्हाच्या शेतात प्रचंड पॅराशूटसह कोसळली. त्यांनी या प्रकाराची माहिती नासाच्या कार्यालयाला कळविली. त्यानंतर नासाच्या संशोधकांचे पथक घटनास्थळी आले. त्यांनी कोसळलेल्या उपकरणाचे भाग परत घेऊन गेले.
वॉल्टर म्हणाल्या, जमिनीवरून वर पाहताना त्याचा खरा आकार कळत नाही. पॅराशूट तब्बल 30 फूट लांबीचे होते प्रचंड आकाराचे होते. ही घटना आमच्या डोळ्यांसमोर घडली यावर विश्वास बसत नाही. खूपच भन्नाट अनुभव होता, असे वॉल्टर यांनी सांगितलं. त्यांनी आणि त्यांच्या कुटुंबाने फोटो आणि व्हिडीओदेखील टिपले. दरम्यान, नासाने याबाबत खुलासा केला आहे. नासाच्या कोलंबिया सायंटिफिक बलून फॅसिलिटीतर्फे हे उपकरण न्यू मेक्सिकोमधील फोर्ट समनर येथून उच्च उंचीवरील संशोधन बलूनद्वारे सोडण्यात आले होते. तारे, आकाशगंगा आणि कृष्णविवरांविषयी माहिती गोळा करण्यासाठी हे बलून 20 मैलांहून उंच वातावरणात वैज्ञानिक प्रयोगांसाठी वापरले जातात.