मॉस्को : रशियाची राजधानी मॉस्कोच्या दक्षिणेस संशोधकांना एक अनोखा शोध लागला आहे. याठिकाणी 40 हजार वर्षांपूर्वीच्या वुली मॅमथच्या हाडांचा एक जणू ‘महाल’च सापडला आहे. वुली मॅमथ हे प्रागैतिहासिक काळातील केसाळ हत्ती होते जे दहा हजार वर्षांपूर्वी लुप्त झाले. एकेकाळी युरेशिया आणि उत्तर अमेरिकेच्या अनेक भागांमध्ये ते वावरत होते. ते नेमके कशामुळे लुप्त झाले, हा अद्यापही संशोधनाचा विषय आहे. बेसुमार शिकारीचे ते बळी ठरले असे मानले जाते व रशियात इतक्या मोठ्या संख्येने त्यांची हाडे एकाच ठिकाणी सुरक्षित पद्धतीने सापडल्याने या दाव्याला बळ मिळाले आहे.
मॉस्कोपासून दक्षिणेस 300 मैलावर केलेल्या उत्खननात हा हाडांचा महाल आढळून आला. याठिकाणी यापूर्वी 1960 व 70 च्या दशकातही वैज्ञानिक उत्खनन झाले होते. त्यावेळी तिथे काही छोटे अवशेष सापडले होते. मात्र, आता अविश्वसनीय असे मोठे आणि प्रचंड संख्येत मॅमथचे अवशेष सापडले आहेत. अँटिक्विटी जर्नलच्या रिपोर्टनुसार संशोधकांना याठिकाणी सुमारे 30 फूट बाय 30 फूट आकाराची एक विशिष्ट संरचना आढळली. ही संरचना मॅमथच्या वेगवेगळ्या हाडांपासून बनवलेली आहे. ती हिमयुगाच्या काळात बनवण्यात आली होती. या संरचनेच्या भिंती 51 विशाल जबड्यांची हाडे व 64 विशाल कवट्यांपासून बनवलेल्या होत्या. प्रमुख संशोधक डॉ. अलेक्झांडर प्रायर यांनी याबाबतची माहिती दिली. त्यांनी सांगितले, ‘कोस्टेंकी 11’ या कठोर वातावरणात राहणार्या प्रागैतिहासिक काळातील शिकारी व संग्रहकर्त्यांचे एक दुर्लभ उदाहरण सादर करते. याठिकाणी एक नैसर्गिक झरा होता जो संपूर्ण हिवाळ्यात गोठून न जाता पाणी देत असे. त्यामुळे याठिकाणी माणूस व मॅमथ हे दोन्ही पाण्याच्या आशेने आले असावेत. याठिकाणी आढळलेली हाडे ही माणसाने शिकार केलेल्या मॅमथची आहेत की नैसर्गिकरीत्या मृत्युमुखी पडलेल्या मॅमथची, हे समजलेले नाही. त्याबाबतचे संशोधन अद्याप सुरू आहे. यापूर्वी मेक्सिको सिटीजवळ मानवनिर्मिती ‘जाळ्या’त वुली मॅमथचे एक डझनपेक्षाही अधिक सांगाडे आढळून आले होते. मेक्सिकोच्या या राजधानीपासून उत्तरेत टुल्टेपेकमध्ये दोन खड्ड्यात हे अवशेष होते. तिथे चौदा मॅमथचे अवशेष व सुमारे 800 हाडे सापडली होती. त्यावरून हे संकेत मिळाले होते की, तत्कालीन माणूस या विशालकाय प्राण्यांची मांस व अन्य कारणांसाठी मोठ्या प्रमाणात शिकार करीत असे.