जगातील सर्वात महागड्या वस्तूंची चर्चा सुरु झाल्यानंतर साहजिकच, वैभवशाली, प्रशस्त बंगले, फ्लॅट, अपार्टमेंटस्, इतकेच नव्हे तर आलिशान कार्सचा ताफा नजरेसमोर झळकून जाईल. मात्र, या जगात काही फळफळावळेदेखील इतकी महागडी आहेत की, त्यावर सकृदर्शनी विश्वासही बसणार नाही. आपल्याला अगदी साधारणपणे 200 ते 300 रुपये किलो दर असणारी फळेदेखील महागडी वाटतात. पण, जगभरात काही फळे इतकी महागडी आहेत की, त्यांचा किलोचा दर अगदी काही लाखांच्या घरात पोहोचलेला असतो. इतकेच नव्हे तर काही फळं अशी आहेत, जी लाखो रुपये मोजल्यानंतरही एखाद दुसरीच मिळतात.
युबारी खरबूज हे जगातील सर्वात महागड्या फळांपैकी एक आहे. हे फळ जपानमध्ये पिकवले जाते. याचे वैशिष्ट्य म्हणजे ते क्वचितच जपानबाहेर निर्यात केले जाते. सूर्यप्रकाशापासून दूर अशा ग्रीन हाऊसमध्ये ते पिकवावे लागते. युबरी खरबुजाच्या जोडीची किंमत 20 लाख रुपये इतकी असते. याचाच अर्थ असा की, यातील एका युबरी खरबुजासाठी थोडेथोडके नव्हे, तर चक्क 10 लाख रुपये मोजावे लागतात.
जगातील सर्वात महागडा आंबा म्हणून तैय्यो नो तॅमॅगो या जातीचा समावेश होतो. या खास जातीच्या आंब्याचे उत्पादन जपानमधील मियाझाकी प्रिफेक्चरमध्ये घेतले जाते. नंतर हा आंबा संपूर्ण देशात विक्रीसाठी उपलब्ध करुन दिला जातो. हा आंबा किलोमध्ये विकला जातो आणि प्रत्येक किलोचा दर 3 लाख रुपयांपेक्षा घरात असतो.
जपानच्या मातीतच आकारास येणारी आणखी एक महागडी फळाची जात म्हणजे रुबी रोमन द्राक्षे. जगातील सर्वात महागड्या फळांमध्ये द्राक्षाच्या या जातीचाही आवर्जून समावेश होतो. कित्येकदा या द्राक्षाचा अगदी एक घडदेखील साडेसात लाख रुपयांना विकला गेल्याच्या नोंदी आढळून येतात. आश्चर्य म्हणजे या जातीतील एका घडाला जेमतेम 24 द्राक्षे असतात, तरीही या जातीच्या द्राक्षांना प्रचंड मागणी असते.
जगातील सर्वात महागड्या फळांमध्ये लॉस्ट गार्डन्स ऑफ हेलिगन या अननसच्या जातीचाही समावेश होतो. पिवळेधमक असणारे हे अननस अतिशय महागडे अननस म्हणून ओळखले जाते. इंग्लंडमधील लॉस्ट गार्डन्स ऑफ हेलिगन येथे हे अननस पिकवले जाते आणि त्यावरूनच या जातीला सदर नाव देण्यात आले आहे. हा अननस पूर्ण पिकण्यासाठी तब्बल दोन वर्षांचा कालावधी लागतो. या एका अननसाची किंमत चक्क 1 लाख रुपये इतकी असते.
डेकोपोन सायट्रसमध्ये बिया नसतात. चवीने अतिशय गोड असलेल्या या फळाची 1972 मध्ये जपानच्या भूमीतच लागवड केली गेली होती. या फळाची किंमतदेखील 60 हजार ते 80 हजारांच्या घरात असल्याचे सांगण्यात येते.