

डास नावाचा उपद्रवी जीव निसर्गाने का निर्माण केला हे कळत नाही. कानाभोवती कर्कश भुणभुण करणारा आणि मलेरियासारख्या जीवघेण्या आजारांचा फैलाव करणारा हा कीटक जगभरातील लोकांना वैताग आणणारा आहे. मात्र, जगभरात काही अशी ठिकाणे आहेत, जिथे डासांचा त्रास नाही. यापैकी दोन प्रमुख ठिकाणे म्हणजे आईसलँड आणि अंटार्क्टिका.
आईसलँड : आईसलँड हे जगातील त्या मोजक्या ठिकाणांपैकी एक आहे, जिथे डास आढळत नाहीत. याचे मुख्य कारण तेथील असामान्य हवामान आणि पर्यावरणीय परिस्थिती आहे. आईसलँडमध्ये हिरवळ आणि कीटकांचे जीवन टिकवून ठेवू शकणारे हंगामी तापमान असले, तरी डासांसाठी ते योग्य नाही. डास नैसर्गिकरित्या कधीही आईसलँडमध्ये स्थलांतरित झाले नाहीत. डासांना प्रजननासाठी आवश्यक असलेले उष्ण, साचलेले पाणी आईसलँडमध्ये नाही. आईसलँडचे थंड हवामान आणि योग्य प्रजनन परिस्थितीचा अभाव यामुळे जरी डास बाहेरून आले, तरी त्यांचे जीवनचक्र पूर्ण करणे त्यांना कठीण जाते आणि ते जास्त काळ तग धरू शकत नाहीत. काही सिद्धांतांनुसार आईसलँडमधील मातीची रचना देखील यात भूमिका बजावते, परंतु, थंड हवामान आणि साचलेल्या पाण्याचा अभाव हीच मुख्य कारणे आहेत. मानवी प्रवासातून डास तिथे येऊ शकतात; परंतु ते दीर्घकाळ टिकणार नाहीत.
अंटार्क्टिका : अंटार्क्टिका हेदेखील जगातील त्या ठिकाणांपैकी एक आहे जिथे डास नाहीत. याचे मुख्य कारण म्हणजे तेथील अत्यंत थंड हवामान. डास सामान्यतः उष्ण, दमट वातावरणात वाढतात. जरी ते विविध हवामानांमध्ये तग धरू शकतात, तरी अति थंडीत त्यांचे जगणे शक्य नाही. डास प्रजननासाठी साचलेल्या पाण्यावर अवलंबून असतात; परंतु शून्याखालील तापमान असल्यामुळे अंटार्क्टिकात ते प्रजनन करू शकत नाहीत किंवा जगू शकत नाहीत. अंटार्क्टिका हा अत्यंत कोरडा, वार्याचा आणि थंड खंड आहे. तेथील अत्यंत कठोर वातावरणामुळे केवळ काही विशिष्ट जीवजंतूच तग धरू शकतात. वैज्ञानिक केंद्रांवर संशोधक तात्पुरते वास्तव्य करत असले, तरी हे वातावरण डासांसाठी पूर्णपणे अयोग्य राहते. अंटार्क्टिकात कायमस्वरूपी रहिवासी नसल्यामुळे डासांच्या अनुपस्थितीचा फरक पडत नाही.