चुकीच्या खाण्या-पिण्याच्या सवयींसोबतच आपली कमी पाणी पिण्याची सवयदेखील किडनी स्टोन म्हणजेच मुतखडा होण्याचे एक महत्त्वाचे कारण मानले जाते. किडनी स्टोन झाला असल्यास तुम्ही आहाराची काळजी घेतली तरी तुमच्या समस्या बर्याच अंशी सुटू शकतात. किडनी स्टोन झाल्यास कोणत्या गोष्टी सोडाव्या लागतात, जाणून घेऊया! स्टोनच्या रुग्णांनी पुढील गोष्टी टाळाव्यात, अन्यथा तुमचे आजारपण वाढू शकते, असे तज्ज्ञ सांगतात.
तुम्हाला सी फूड आणि मांस खाणे आवडत असेल, तुम्ही नियमितपणे हे खात असाल तरी चांगले आरोग्य हवे असेल तर ते तुम्ही वेळीच सोडले पाहिजे. यासोबतच तुम्हाला अधिक प्रथिनयुक्त पदार्थदेखील टाळावे लागतील. या पदार्थामध्ये प्युरीन नावाचे घटक आढळतात. स्टोनच्या रुग्णाच्या शरीरात प्युरीनचे प्रमाण वाढले, तर शरीरात यूरिक अॅसिडची पातळी वाढू शकते. ज्यामुळे स्टोनचा आकारही वाढू शकतो.
जर तुमच्या शरीरात किडनी स्टोन असतील तर पालक या एरवी अतिशय आरोग्यदायी ठरणार्या हिरव्या पालेभाजीपासून दूर राहणे चांगले. पालकसारख्या हिरव्या भाज्यांमध्ये ऑक्सलेट आढळते. पालक खाल्ल्याने ते कॅल्शियम गोळा करते आणि ते लघवीपर्यंत पोहोचू देत नाही. जर तुम्हाला स्टोन असेल आणि तुम्ही पालक खात असाल तर तुमची प्रकृती बिघडू शकते.
टोमॅटोमध्येही ऑक्सलेटचे प्रमाण भरपूर असते. किडनी स्टोन असलेल्या रुग्णांनी टोमॅटोचे सेवन अजिबात करू नये. तुम्ही टॉमेटो खात असाल, तरी त्याच्या बिया नक्कीच काढा.
तुम्हाला चॉकलेट कितीही आवडत असले तरी स्टोन असल्यास चॉकलेटला ‘नाही’ म्हणावेच लागेल. मुतखडा असेल तर तज्ज्ञ तुम्हाला चॉकलेट सोडून देण्याचा सल्ला देतात. चॉकलेटमध्ये ऑक्सलेटस् असल्यामुळे स्टोनची समस्या वाढू शकते.
स्टोनचा त्रास आहे, हे कळाल्यापासूनच चहा न पिण्याचा सल्ला दिला जातो. अन्यथा रुग्णाला खूप त्रास होऊ शकतो. चहामुळे स्टोनचा आकार वाढू शकतो.
किडनी स्टोनचे रुग्ण असाल तर पचायला जास्त वेळ जाईल अशा पदार्थांचा जेवणात समावेश करू नका. मांस, मासे, कोल्ड्रिंक्स इत्यादींचे पदार्थांचा विचार करणेही सोडून द्या. फळांमध्ये, स्ट्रॉबेरी आणि प्लम्स तसेच अंजीर आणि मनुका यांसारख्या सुक्या फळांचे सेवन टाळा. दही, चीज आणि लोणी अशा दूध आणि दुग्धजन्य पदार्थांचे सेवन कमी करा. कॅन केलेला सूप, नूडल्स, तळलेले पदार्थ, जंक फूड इत्यादी टाळा. वांगी, मशरूम आणि फ्लॉवर यासारख्या भाज्या टाळाव्यात, यामुळे स्टोनचा त्रास वाढू शकतो.