अंतराळात अंतराळवीराचा मृत्यू झाल्यास परिस्थिती कशी हाताळली जाते?

handling-astronaut-death-in-space
अंतराळात अंतराळवीराचा मृत्यू झाल्यास परिस्थिती कशी हाताळली जाते?Pudhari File Photo
Published on
Updated on

नवी दिल्ली : मानवाने अंतराळात पाऊल ठेवल्याला 60 वर्षांहून अधिक काळ झाला आहे. या काळात सुमारे 20 व्यक्तींचा अंतराळ-संबंधित घटनांमध्ये मृत्यू झाला आहे. 1986 मध्ये झालेल्या स्पेस शटल चॅलेंजर आणि 2003 मधील कोलंबिया दुर्घटनेत 14 अंतराळवीर, तर 1971 मध्ये सोयुझ 11 मध्ये 3 कॉस्मोनॉटस् आणि 1967 मध्ये अपोलो 1 मधील 3 अंतराळवीर यांचा यामध्ये समावेश आहे. या शोकांतिकांमुळे अंतराळ प्रवासातील धोके अधोरेखित होतात, पण याचबरोबर सध्याच्या मिशनमध्ये एखाद्या अंतराळवीराचा अंतराळात मृत्यू झाल्यास नेमके काय घडू शकते, असे प्रश्न निर्माण झाले आहेत.

प्रोटोकॉल आणि तयारी

नासा आणि इतर अंतराळ संस्था जवळपास प्रत्येक परिस्थितीसाठी अंतराळवीरांना तयार करतात, ज्यात मृत्यूचा समावेश आहे. क्रू सदस्य प्रशिक्षणादरम्यान ‘डेथ सिम्युलेशन’मधून जातात. यामध्ये मृतदेह एका सीलबंद अंतराळयानात जैव-धोका (बायोहझार्ड) बनू शकतो, त्यामुळे मिशन आणि उर्वरित क्रूची सुरक्षा कशी करावी, हे शिकवले जाते. मृत व्यक्तीचा सन्मान राखणे हे देखील या प्रोटोकॉलमध्ये महत्त्वाचे मानले गेले आहे.

इंटरनॅशनल स्पेस स्टेशन (आयएसएस) वर काय होते?

जर इंटरनॅशनल स्पेस स्टेशनवर (आयएसएस) कोणाचा मृत्यू झाला, तर मृत अंतराळवीराला साधारणपणे थंड परिस्थितीत (कोल्ड कंडिशन) ठेवले जाते आणि काही तासांत किंवा दिवसांत पृथ्वीवर परत येणार्‍या कॅप्सूलमधून त्याला परत आणले जाते. नासाने पृथ्वीच्या कक्षेत दफन करणे किंवा मृतदेह थेट अंतराळात सोडणे या पर्यायांवर विचार केला होता, परंतु या पर्यायांमध्ये नैतिक, कायदेशीर आणि पर्यावरणीय गुंतागुंत आहे. त्यामुळे मृतदेह शक्य तितक्या लवकर पृथ्वीवर परत आणणे याला प्राधान्य दिले जाते.

चंद्रावरील मिशनमध्ये मृत्यू

चंद्रावरील मिशनदरम्यान मृत्यू झाल्यास, क्रू काही दिवसांत मृतदेहासह पृथ्वीवर परत येऊ शकतो. प्रवासाचा कालावधी कमी असल्याने मृतदेहाच्या संरक्षणाची मोठी चिंता नसते. चंद्राच्या पृष्ठभागावर दफन करण्याची शक्यता विचारात घेतली गेली आहे, परंतु चंद्राला पार्थिवातील सूक्ष्मजीव दूषित करण्याची शक्यता असते. त्या चंद्रावर दफन करण्याची शक्यता सध्यातरी शक्य नाही.

मंगळ मोहिमेतील सर्वात मोठे आव्हान

सर्वात कठीण परिस्थिती मंगळ मोहिमेत उद्भवू शकते. मंगळावर जाण्यासाठी आणि परत येण्यासाठी वर्षांचा कालावधी लागतो आणि पृथ्वी सुमारे 300 दशलक्ष मैल दूर असल्याने, त्वरित परत येणे अशक्य आहे.

नासाने मृतदेह विशेष बॉडी बॅग्स किंवा अंतराळयानातील स्वतंत्र कप्प्यांमध्ये साठवण्यावर विचार केला आहे. विघटन प्रक्रिया (डिकंपोज) मंदावण्यासाठी नियंत्रित तापमान आणि आर्द्रता आवश्यक असेल.

मंगळावर दफन किंवा दहन केल्याने जैविक दूषितता (बायॉलॉजिकल कॉन्टेमिनेशन) होण्याचा धोका आहे. त्यामुळे क्रू पृथ्वीवर परत येईपर्यंत मृतदेहाचे दीर्घकाळ संरक्षण करणे हा सर्वात संभाव्य उपाय आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news