न्यूयॉर्क : आपल्या हातात स्मार्टफोन आल्यापासून अख्खं जग जवळ आलेय, हे खरे असले तरी स्मार्टफोन वापरणार्या व्यक्तींची सर्व माहिती गुगलकडे जाऊ लागली आहे. स्मार्टफोन वापरणार्या प्रत्येक व्यक्तीच्या आवडीनिवडी काय आहेत, सवयी काय आहेत, त्या व्यक्ती कुठे जातात, कुठे किती वेळ व्यतीत करतात, कोणाला भेटतात, कोणाशी काय पत्रव्यवहार करतात ही सर्व माहिती गुगलकडे रोजच्या रोज जमा होत असते. गुगल आता आपल्या सर्वांच्या आयुष्यात इतका मिसळून गेला आहे, की त्याच्याशिवाय आयुष्याची कदाचित कल्पनाही करवणार नाही. अर्थातच, ही बाब खूप धोकादायक आहे. वेगवेगळ्या सर्व्हिसेसमधून, वेगवेगळ्या पद्धतींनी आणि युझर्स कसा वापर करतात त्या माध्यमातून गेल्या काही वर्षांपासून गुगल डेटा जमा करत आहे. गुगलकडे आजच्या घडीला जेवढा डेटा आहे, तेवढा कोणाकडेही नसेल. कदाचित आपण स्वतःलाही ओळखत नसू, एवढा गुगल आपल्याला ओळखत असेल.
आपण गुगलवर काय सर्च करतो, सर्चवर किती वेळ व्यतीत करतो, रोज कुठे जातो-येतो, कोणत्या सेवा घेतो, ऑनलाईन काय करतो, ऑनलाईन काय वाचतो, या सगळ्याची माहिती गुगलकडे साठवली जाते. असे म्हटले जाते, की युझर्सचे बोलणेही स्मार्टफोनवर अनेक अॅप्सच्या माध्यमातून रेकॉर्ड केले जात असते. ई-मेलमध्ये काय लिहिले जात आहे, यावरही गुगलची नजर असते. या सर्व माहितीच्या एकत्रीकरणातून गुगलला युझर्सचे वर्तन कळते. त्यातून युझरचे एक मोठे प्रोफाईल तयार केले जाते. त्यात तो काय करतो, त्याचं व्यक्तिमत्त्व कसे आहे, आवडी-निवडी काय आहेत, वर्तन कसे आहे, त्याची गुपिते काय आहे, याचा त्यात समावेश असतो. त्यातून तो त्या व्यक्तीचे सतत विश्लेषण करत राहतो.
गुगल मॅपसारख्या सेवा वापरणार्या व्यक्ती कुठे प्रवास करतात, त्याची नोंद गुगलकडे होते. युझर किती वाजता घराबाहेर पडतो, कोणत्या मार्गाने कुठे जातो, कुठे थांबतो, ही माहिती युझरच्या नकळत रेकॉर्ड केली जाते. त्यामुळे सर्व रूटिन गुगलला कळते. तिकीट बुकिंगबद्दलही गुगलला कळते. साहजिकच, आता हवामानाच्या अंदाजाप्रमाणे येत्या काही दिवसांत गुगल असेही सांगू शकेल, की पुढच्या काही दिवसांत तुम्ही काय करणार आहात?
असे सांगितले जाते की, गुगलचा अल्गोरिदम अत्यंत हुशार आहे. तो युझर्सच्या डेटाचे विश्लेषण करून त्यातून असा काही निष्कर्ष काढतो, की कदाचित खुद्द युझरलाही स्वतःबद्दल इतकी माहिती नसेल. युझरच्या पर्सनॅलिटीची परिपूर्ण माहिती गुगल तयार करतो. युझर रोज कुठे राहतो, त्याच्या घरात कोण आहे, ही सगळी माहिती गुगलला फोटोज आणि संवादातूनही कळते. गुगलचा डेटा आता इतका समृद्ध झाला आहे, की प्रत्येक भागातल्या व्यक्तींचा स्वभाव, त्यांचे कल आणि समज आदी बाबींचे सहज वर्गीकरण तो करू शकतो. त्यामुळे आपण पुढील काही दिवसांत काय करणार आहोत, हे गुगलने सांगण्यात कठीण तसे काहीच नाही, ही देखील कटू वस्तुस्थिती!