हैदराबाद : समुद्रात फेकलेल्या जाळ्यात मासेच सापडतील असे काही नाही. त्यामध्ये समुद्रात बुडालेल्या अन्यही अनेक गोष्टी अडकून वर येऊ शकतात. आता आंध्र प्रदेशातील नेल्लोर येथेही अशीच एक घटना घडली आहे. मासेमारीसाठी समुद्रात गेलेल्या मच्छीमारांच्या जाळ्यात अशी वस्तू अडकली, जी पाहून सगळेच थक्क झाले. ही वस्तू म्हणजे चक्क एका रॉकेटचे शेल होते. शंभर किलोपेक्षाही अधिक वजनाचे हे रॉकेट शेल दिसताच मच्छीमारांनी त्याची माहिती पोलिसांना दिली. यानंतर ही बाब नौदलासही कळवण्यात आली. ही माहिती मिळताच घटनास्थळी पोहोचलेल्या नौदल अधिकार्यांनी पाहणी केली.
नेल्लोर येथील काही मच्छीमार मासे पकडण्यासाठी समुद्रात गेले होते. त्यांनी समुद्रात जाळे टाकले असता, त्यामध्ये एक मोठी वस्तू अडकली. त्यांच्या जाळ्यात एखादा मोठा मासा अडकला असावा, असा त्यांचा समज झाला. त्यांनी जाळे वर उचलल्यावर त्यामध्ये हे शंभर किलो वजनाचे रॉकेट आढळले. नौदल अधिकार्यांनी सांगितले की, हे रॉकेटचे शेल आहे, पण ते नौदलाचे नाही. सध्या पोलिसांनी हे रॉकेट शेल ताब्यात घेऊन या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. या रॉकेटमध्ये कोणतीही दिशादर्शक यंत्रणा नाही किंवा ट्रिगरिंग यंत्रणा, फ्यूज वगैरे नाही. याशिवाय यामध्ये कोणत्याही प्रकारचे द्रव किंवा इंधनही नाही. ते समुद्रात कसे आले याचा आता तपास सुरू करण्यात आला आहे.