

वॉशिंग्टन : मंगळ ग्रहाच्या रहस्यांचा शोध घेत असलेल्या नासाच्या क्युरिऑसिटी रोव्हरने एक मोठी कामगिरी केली आहे. या रोव्हरने मंगळाच्या पृष्ठभागावर असलेल्या विशाल आणि विचित्र ‘कोळ्याच्या जाळ्यांसारख्या’ रचनांचे आतापर्यंतचे पहिलेच अत्यंत जवळून घेतलेले फोटो पृथ्वीवर पाठवले आहेत. या शोधामुळे मंगळावर एकेकाळी पाणी होते आणि कदाचित जीवनही अस्तित्वात होते का, या प्रश्नाच्या उत्तराच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल टाकले गेले आहे.
शास्त्रज्ञांनी या जाळ्यांसारख्या दिसणार्या रचनांना ‘बॉक्सवर्क’ असे नाव दिले आहे. या रचना म्हणजे खनिज-समृद्ध खडकांच्या एकमेकांना छेदणार्या उंचवट्यांचे एक विशाल जाळे आहे, जे तब्बल 20 किलोमीटरच्या परिसरात पसरलेले असू शकते. अंतराळातून पाहिल्यास हे एखाद्या महाकाय कोळ्याने विणलेल्या जाळ्याप्रमाणे दिसते. शास्त्रज्ञांच्या मते, कोट्यवधी वर्षांपूर्वी मंगळावरील खडकांच्या भेगांमधून भूजल वाहत होते. या पाण्यातील खनिजे त्या भेगांमध्ये साचून सिमेंटप्रमाणे कठीण झाली.
कालांतराने, मंगळावरील वेगवान वार्यामुळे आजूबाजूचा मऊ खडक झिजून गेला; पण या कठीण खनिजांचे उंचवटे तसेच राहिले आणि हे अजब जाळे तयार झाले. पृथ्वीशी अनोखे साम्य. विशेष म्हणजे, अशाच प्रकारच्या पण आकाराने लहान रचना पृथ्वीवरील काही गुहांमध्येही आढळतात. ज्याप्रमाणे गुहांमध्ये पाण्यामुळे चुनखडीचे स्तंभ तयार होतात, त्याच प्रक्रियेने मंगळावर हे महाकाय जाळे तयार झाले असावे, असा शास्त्रज्ञांचा अंदाज आहे.
मिशनचे पुढचे लक्ष्य क्युरिऑसिटी रोव्हर सध्या मंगळावरील ‘गेल क्रेटर’ नावाच्या मोठ्या खड्ड्यातील ‘माऊंट शार्प’ या प्रचंड पर्वताच्या उतारावर आहे. याच ठिकाणी हे ‘बॉक्सवर्क’ सापडले आहे. शास्त्रज्ञांसाठी हे ठिकाण अत्यंत महत्त्वाचे आहे. कारण, पर्वतावर इतर कोठेही अशा रचना आढळत नाहीत आणि त्या फक्त याच ठिकाणी का आहेत, हे एक मोठे कोडे आहे. या जाळ्यांचा सखोल अभ्यास करणे हे आता मिशनचे प्रमुख उद्दिष्ट आहे.