लंडन : मानवाचा मेंदू म्हणजे निसर्गाची सर्वात थक्क करणारी करामत आहे. मानवाने बुद्धीच्या जोरावरच जगात आपले साम—ाज्य बनवलेले आहे. मात्र मानवाशिवायही अनेक जीवांमध्ये त्यांचे जीवनयापन करण्यासाठी योग्य अशी बुद्धी असते. जी फळमाशी फळांना सडवते, तिच्याकडे नसती आफत म्हणून आपण पाहात असलो तरी ती फार चतुर असते व तिचा मेंदूही तल्लख असतो. कुठलीही कृती करण्यापूर्वी फळमाशी विचार करते, असे ऑक्सफर्डच्या संशोधकांनी म्हटले आहे. ऑक्सफर्ड विद्यापीठातील मेंदू वैज्ञानिकांनी याबाबतचे संशोधन केले असून कुठलेही अवघड निर्णय घेताना फळमाशी बराच काळ विचार करते.
फळमाश्यांवर करण्यात आलेल्या प्रयोगात त्यांना वासातील फरक ओळखण्यास प्रवृत्त करण्यात आले. त्यावेळी त्यांनी या वासांना सरधोपटपणे प्रतिसाद दिला नाही, तर त्यातील पर्याय निवडताना त्यांनी संपूर्ण विचार केल्याचे दिसून आले. त्यांनी त्यापूर्वी बरीच माहिती गोळा केली हे त्यांच्या उच्च बुद्धिमत्तेचे लक्षण समजले जाते. माकडे किंवा माणूस यांच्या जवळपास जाणारी बुद्धिमत्ता त्यांना असल्याचे दिसून आले आहे. कुठल्याही गोष्टीवर अविचाराने प्रतिक्रिया न देता थांबून विचार करून प्रतिक्रिया देणे हे महत्त्वाचे असते तरच बोधन व बुद्धिमत्ता या दोन बाबी आपल्याला त्यात प्रतीत होतात, असे प्रा. गेरो मिसेबॉक यांनी सांगितले. त्यांच्या मते फळमाशीमध्ये मेंदूची शक्ती आश्चर्यकारक असते.
पण, अजून त्याची ओळख पटली नव्हती. एफओएक्सपी हे जनुक फळमाशीच्या मेंदूतील 200 न्यूरॉन्समध्ये असते; त्याचा फळमाशीच्या मेंदूतील निर्णय प्रक्रियेशी संबंध असतो. ड्रासोफिला या फळमाशीवर केलेल्या प्रयोगात त्यांना एका खास कक्षात ठेवून वास ओळखण्यास प्रवृत्त केले गेले. त्यात असे दिसून आले की, त्यांच्या निर्णय क्षमतेची गणितीय प्रारूपे ही माकड व माणूस यांच्याशी साधर्म्य असलेली आहेत. ‘सायन्स’ या नियतकालिकात हे संशोधन प्रसिद्ध झाले आहे.