

कैरो : जगातील सर्वात मोठे पुरातत्त्व संग्रहालय म्हणून ओळखले जाणारे ग्रँड इजिप्शियन म्युझियम अखेर जनतेसाठी खुले झाले आहे. 1.2 अब्ज डॉलर्स (सुमारे 10,000 कोटी) खर्चून उभारलेलं हे संग्रहालय गिझाच्या महान पिरॅमिडच्या छायेखाली उभे आहे.
या संग्रहालयाच्या रूपाने 7 हजार वर्षांचा इतिहास एका छताखाली पाहण्यास मिळणार आहे. या संग्रहालयात 1 लाखांहून अधिक प्राचीन वस्तू आहेत. यात इजिप्तच्या पूर्व-राजवंशीय काळापासून ग्रीक आणि रोमन युगापर्यंतचा इतिहास उलगडला आहे. राजा तुतनखामुनचा खजिना पहिल्यांदाच पूर्ण स्वरूपात पाहण्यास उपलब्ध होणार आहे. ब्रिटिश पुरातत्त्वज्ञ हॉवर्ड कार्टर यांनी 1922 मध्ये शोधलेल्या राजा तुतनखामुनच्या थडग्यातील सर्व 5,500 वस्तू आता एकत्र प्रदर्शित करण्यात आल्या आहेत. या वस्तूंमध्ये सोन्याचा मुखवटा, सिंहासन, रथ, दागिने, सँडल्स आणि अन्नाचे अर्पणसुद्धा आहेत. डॉ. तारेक तौफिक यांनी माहिती देताना सांगितले की, ‘हॉवर्ड कार्टर यांना 100 वर्षांपूर्वी जसं द़ृश्य दिसलं, तसाच अनुभव आता पर्यटकांना मिळणार आहे. काहीही झाकून ठेवलेले नाही.’
आयरिश आर्किटेक्चरल कंपनीने डिझाईन केलेल्या या संग्रहालयाच्या इमारतीचे पिरॅमिडसद़ृश प्रवेशद्वार आणि अलाबास्टरच्या त्रिकोणी पॅनेल्सनी सजलेला भाग प्राचीन आणि आधुनिक इजिप्तमधील पूल अर्थात बंध निर्माण करतो. प्रवेशातच रामेसेस द्वितीयचा 11 मीटर उंच पुतळा पर्यटकांचं स्वागत करतो, तर विशाल जिन्यावर राजे, राण्या आणि देवतांच्या मूर्ती मांडल्या आहेत. संग्रहालयातील खास आकर्षण म्हणजे 16 मीटर लांबीचा रामेसेसचा ओबेलिस्क, जो काचेच्या कवचात लटकवला गेला आहे. हे संग्रहालय केवळ प्रदर्शनासाठीचे ठिकाण नाही, तर संवर्धन आणि संशोधन केंद्रही आहे. इजिप्तमधील तज्ज्ञांनी स्वतः तुतनखामुनच्या थडग्याचे आणि वस्त्रांचं पुनरुत्थान केलं आहे. डॉ. तौफिक म्हणाले, ‘हे केवळ इतिहासाचं नाही, तर आधुनिक इजिप्तच्या कौशल्याचंही प्रदर्शन आहे.’
इजिप्त सरकारला अपेक्षा आहे की, गिझामध्ये साकारलेले हे संग्रहालय दरवर्षी 8 दशलक्ष पर्यटकांना आकर्षित करेल आणि देशाच्या पर्यटन व अर्थव्यवस्थेला नवसंजीवनी देईल. या संग्रहालयाचे शनिवार, 1 नोव्हेंबरला उद्घाटन झाले. त्यानंतर इजिप्तमधील तज्ज्ञांनी पुन्हा एकदा ‘रोसेटा स्टोन’ (ब्रिटिश म्युझियम), ‘डेंडेरा झोडियाक’ (लुव्र, फ्रान्स) आणि ‘नेफरतीतीचा पुतळा’ (बर्लिन) परत मिळवण्याची मागणी केली आहे. डॉ. मोनिका हॅना म्हणाल्या, ‘ग्रँड म्युझियममुळे जगाला दाखवता आले आहे की, इजिप्त आता आपल्या वारशाची योग्य काळजी घेऊ शकते.’ 1992 मध्ये प्रस्तावित झालेल्या आणि 2005 मध्ये सुरू झालेल्या या संग्रहालयाचे काम तीन दशकांनंतर पूर्ण झालेे. तुतनखामुनचा हा संग्रहालयीन पुनर्जन्म म्हणजे इजिप्तच्या भूतकाळ आणि वर्तमानातील नवा संवाद, असे मानले जात आहे.