लिमा : पेरूमधील पुरातत्त्व संशोधकांनी 1300 वर्षांपूर्वीच्या राणीच्या दरबाराचा शोध घेतला आहे. हे दालन विविध रंगीत भित्तिचित्रांनी सजवलेले आहे. त्यामध्ये या मोचे साम्राज्याच्या राणीचे चित्रण आहे. या राणीच्या देहाचे अवशेष मात्र अद्याप सापडलेले नाहीत.
पॅनामार्का याठिकाणी केलेल्या उत्खननात दरबाराचे हे दालन सापडले. ते इसवी सनाच्या सातव्या शतकातील आहे. त्या काळात संबंधित परिसरावर मोचे साम्राज्य होते. इसवी सन 350 ते 850 या काळात उत्तर पेरूमध्ये मोचे साम्राज्य भरभराटीस आले होते. या काळात अनेक सुंदर इमारती व मकबरे बांधण्यात आले. मानवी चेहरे असलेल्या सिरॅमिकच्या वस्तू आणि अन्य अनेक कलाकृतीही या काळात बनवण्यात आल्या होत्या. त्या काळात पेरूमध्ये लेखनकला अवगत नव्हती. पेरूमधील इंकापूर्व काळातही राण्या होत्या; पण पॅनामार्कामध्ये तसेच पेरूमध्ये इतरत्रही खास एखाद्या राणीचे सिंहासन असलेले दालन सापडलेले नव्हते. तिचे सिंहासन हिरव्या रत्नांनी व तिच्याच केसांनी सजवले होते. आता या केसांची डीएनए चाचणीही केली जाणार आहे. या दालनाच्या खांब व भिंतींवर अनेक म्युरल्स, भित्तिचित्रे आहेत. अगदी सिंहासनावरही चित्रे रंगवलेली आहेत. त्यामध्ये विविध प्रकारे या राणीचे चित्रण केलेले दिसून येते. एका चित्रात ती मुकुट परिधान करून सिंहासनावर बसलेली दिसते. एका चित्रात ती सिंहासनावर बसून पक्ष्यासारखे दिसणार्या माणसाबरोबर संवाद साधत असताना दिसते. या राणीचा मकबरा किंवा तिच्या देहाचे अवशेष अद्याप शोधण्यात आलेले नाहीत.