

वॉशिंग्टन डी.सी. : पृथ्वीवर 66 दशलक्ष वर्षांपूर्वी झालेल्या उल्कापिंडाच्या (लघुग्रहाचे तुकडे) आघातामुळे डायनासोर नामशेष झाले, हा सिद्धांत आज मानला जातो. मात्र, डायनासोर या उल्कापिंडाच्या आघातापूर्वीच र्हासाकडे होते, या प्रचलित कल्पनेला नागालँड विद्यापीठाच्या एका नवीन संशोधनाने आव्हान दिले आहे. नवीन कार्बन डेटिंगनुसार, उल्केच्या धडकेच्या अगदी काही लाख वर्षांपूर्वीही डायनासोरचे पर्यावरण समृद्ध होते, असे आढळले आहे. न्यू मेक्सिकोमधील नाशोईबिटो मेंबर नावाच्या खडकांच्या रचनेत आढळलेल्या जीवाश्मांचा अभ्यास करण्यात आला. या ठिकाणी शिखरासारखे असलेले हॅड्रोसॉर्स, लांब मानेचे सॉरोपॉडस् आणि विविध प्रकारच्या वनस्पतींचे जीवाश्म सापडले.
या ठिकाणचे हे खडक यापूर्वी 70 दशलक्ष वर्षे जुने मानले जात होते. मात्र, भूगर्भशास्त्रज्ञ अँड्र्यू फ्लिन आणि त्यांच्या टीमने खडकांचे भूवैज्ञानिक वय निश्चित केले. त्यांनी केलेल्या या नवीन विश्लेषणानुसार, हे खडक 66.38 दशलक्ष वर्षे जुने आहेत. म्हणजेच क्रिटेशियस कालखंडाच्या शेवटच्या काही लाख वर्षांतील आहेत. यावरून सिद्ध होते की, उल्का धडकण्यापूर्वी डायनासोरचे एक विकसित पर्यावरण अस्तित्वात होते.
या नाशोईबिटो साईटची तुलना याच कालखंडातील प्रसिद्ध हेल क्रीक (डकोटास, वायोमिंग आणि मॉन्टाना) येथील जीवाश्म नोंदीशी करण्यात आली. नाशोईबिटोमध्ये अॅलमोसॉरस नावाचे सॉरोपॉड आणि शिखरांसारखे हॅड्रोसॉर मोठ्या प्रमाणात होते, जे हेल क्रीकमध्ये नव्हते. याउलट हेल क्रीकमध्ये शिखरासारखे हॅड्रोसॉर होते. या फरकावरून शास्त्रज्ञांनी असा निष्कर्ष काढला की, डायनासोरची विविधता कमी होत नव्हती, तर हवामान आणि भूगोल त्यांच्या वितरणात मोठी भूमिका बजावत होते. लंडनच्या नैसर्गिक इतिहास संग्रहालयातील जीवाश्मशास्त्रज्ञ पॉल बॅरेट यांच्या मते, डायनासोर गुंतागुंतीच्या असलेल्या परिसंस्थांचा भाग होते.