नवी दिल्ली : आयआयटी दिल्लीच्या संशोधकांनी एक असे उपकरण बनवले आहे जे केवळ एका तासातच डेंग्यूचे निदान करू शकते. या उपकरणाचा आकार लहान असून ते सहजपणे एका ठिकाणाहून दुसरीकडे हलवता येऊ शकते. शिवाय ते हाताळणेही अतिशय सोपे आहे. आरोग्य कर्मचारी ते सहजपणे विविध कॉलन्यांमध्ये नेऊन त्याच्या मदतीने टेस्ट करून डेंग्यूला प्रतिबंध करण्यासाठी त्याचा वापर करू शकतील.
प्रा. जे.पी. सिंह यांनी याबाबतची माहिती दिली. त्यांनी सांगितले की हे उपकरण 'सरफेस इन्हॅस्ड रमन स्पेक्ट्रोस्कोपी' (एसआयआरएस) वर आधारित आहे. त्यामध्ये सिल्व्हर नॅनोराड बायोसेन्सर लावलेले असतात. हे उपकरण एखाद्या यूरीन किंवा प्रेग्नन्सी किटसारखेच काम करते. केवळ दोन मायक्रोलिटर ब्लड सीरम जर सेन्सर चिपवर टाकले व 785 नॅनोमीटर लेसर बीम लाईट त्यावर प्रक्षेपित केली तर हे उपकरण सीरममधील प्रोटिनची तपासणी सुरू करते. डेंग्यूच्या विषाणूचे वेगवेगळे प्रोटिन्स असतात. त्यापैकी एक आहे 'गोल्ड बायोमार्कर (एनएस-1). या प्रोटिनचा हे उपकरण सहजपणे छडा लावू शकते. तसेच त्याचे प्रमाण कमी आहे की अधिक हे सुद्धा ते सांगू शकते. डिव्हाईस टेस्टसंबंधी डेटाला एका सॉफ्टवेअरच्या मदतीने समजून घेता येते. या सॉफ्टवेअरला 'प्रिन्सिपल कंपोनंट अॅनालायझर' (पीसीए) असे म्हटले जाते. ते उपकरणामधून मिळालेल्या आकडेवारीला वाचून तीन श्रेणींमध्ये टेस्ट रिझल्ट सांगते. त्यामध्ये पॉझिटिव्ह, निगेटिव्ह आणि तिसरा रिझल्ट हेल्दी असा असतो. सध्या या उपकरणाचे प्रोटोटाईप मॉडेल तयार करण्यात आले आहे.