वॉशिंग्टन : फळे किंवा भाज्या दीर्घकाळ ताज्या राहाव्यात यासाठी आपण त्या फ्रीजमध्ये ठेवत असतो; मात्र त्या असेदीर्घकाळफ्रीजमध्येच ठेवल्याने त्यांच्यावर विपरीत परिणाम होतो, असे संशोधकांनी म्हटले आहे. फळे व भाज्यांना दिवसरात्रीचे चक्र अनुभवता आले तरच त्यांच्यातील पोषणमूल्ये वाढतात, असे दिसून आले आहे. फळे व भाज्या सतत अंधारात किंवा सतत उजेडात ठेवण्याने त्यातील पोषकांचे प्रमाण कमी होते.
फळे व भाज्यांना दिवस व रात्रीचे चक्र हे जास्तीत जास्त पोषके व स्वाद निर्माण करण्यासाठी आवश्यक असते, असे एका संशोधनात दिसून आले आहे. आपण जेव्हा फळे व भाज्या दुकानातून विकत आणतो तेव्हा त्या ‘जिवंत’ असतात व दिवसातील कोणता काळ चालू आहे हे त्यांच्यासाठी महत्त्वाचे असते. आपण फळे व भाज्या ज्या पद्धतीने साठवतो त्यावर त्यांच्यातील पोषणमूल्ये व आपले आरोग्य अवलंबून असते. जेव्हा आपण फळे,भाज्या उजेडात म्हणजे बाहेर ठेवतो तेव्हा त्यांना दिवसरात्रीचे चक्र नैसर्गिक व आरोग्यदायी स्थितीत ठेवते. जर आपण फळे,भाज्या उजेड नसलेल्या कपाटात किंवा शीतपेटीत ठेवल्या तर त्यांना कायमचा अंधार किंवा उजेड अनुभवास येतो, त्यामुळे त्यांच्यातील पोषणमूल्ये कमी होतात. भाज्या व फळे हंगामानंतरही प्रकाशीय संदेशांना प्रतिसाद देतात व त्यांची जैविक क्रिया बदलते, त्याचा परिणाम आरोग्य मूल्य व त्यांची कीटकांना तोंड देण्याची क्षमता यावरही होतो, असे अमेरिकेच्या राइस विद्यापीठातील जॅनेट ब्रॅम यांनी सांगितले. त्या म्हणाल्या, की आपण भाज्यांची साठवणूक ही दिवस-रात्र यांच्या चक्रानुसार केली पाहिजे. तसेच त्या केव्हा सेवन करणार आहोत याचा अंदाज घेतला पाहिजे. ब्रॅम व त्यांच्या सहकार्यांनी प्रयोगशाळेत केलेल्या प्रयोगात असे दिसून आले, की वनस्पतींमधील जैविक क्रिया या दिवस-रात्र चक्रानुसार बदलतात व शेतातून तोडल्यानंतरही फळे व भाज्यांचे हे चक्र सुरूच असते. प्राण्यांपेक्षा वनस्पतींची रचना वेगळी असते. त्यांची पाने, फांद्या, फळे यांना स्वतंत्रपणे चयापचयाची व्यवस्था असते, तसेच हे सर्व घटक स्वतंत्रपणे काही काळ जगू शकतात. फळे व भाज्या शेतातून तोडल्यानंतरही त्यांच्यातील जैविक घड्याळ चालू असते व आपण जर त्या भाज्या किंवा फळे फक्त उजेडात किंवा फक्त अंधारात ठेवल्या तर त्याचा विपरीत परिणाम होतो. पालक, झुशिनी, रताळे, गाजर, कोबी यांच्यात दिवस व रात्रीच्या चक्राचा जैविक परिणाम दिसून येतो.