टोकियो : जपानी लोकांनी आत्महत्या केली नाही तर ते शंभर वर्षे सहज जगतात, असे म्हटले जाते. अर्थातच, शतायुषी लोकांची जपानमध्ये मोठी संख्या आहे हे एक वास्तव आहे. त्यामागे त्यांच्या आहारविहाराच्या सवयींचा मोठा भाग आहे. नाश्त्यातील आंबवलेल्या सोयाबिनच्या ‘नाट्टो’पासून ते ‘सीफूड’पर्यंत, जपान्यांचा आहार काटेकोर आरोग्यदायीच असतो. जपानी लोकांचा चहाही असाच दीर्घायुषी बनवण्यासाठी मदत करणारा आहे. जपानी ‘माचा’ चहा म्हणजे एक विशेष प्रकारचा चहा आहे. यामध्ये ग्रीन टी प्रमाणेच अनेक पोषक घटक असतात, पण त्याचं प्रमाण अधिक जास्त असतं. हे पिऊन शरीरात ताजेतवानेपणा आणि ऊर्जा मिळते, शिवाय माचा चहाचे सेवन केल्याने मानसिक शांतता आणि तणाव कमी होण्याचे अनेक फायदे अभ्यासातून दिसून आले आहेत.
‘जर्नल ऑफ फंक्शनल फूडस्’मध्ये प्रकाशित एका संशोधनानुसार, काही उंदरांवर याबाबतचे संशोधन केले गेले. त्या उंदरांमधले स्ट्रेस हार्मोन्स माचा चहाचे सेवन केल्याने कमी झाल्याचे दिसून आले. यामध्ये माचा चहातील काही घटक डोपामाइन डी 1 रिसेप्टर्स आणि सेरोटोनिन 5-एचटी1 ए रिसेप्टर्सवर परिणाम करतात. ज्यामुळे तणाव आणि चिंता कमी होते. या रिसेप्टर्सचं तणावाशी जवळचं नातं आहे. जपानच्या कुमामोटो विद्यापीठातील प्रमुख संशोधक युकी कुरुची यांनी सांगितले की, हा शोध म्हणजे अंतिम निष्कर्ष नाही, यावर आणखी संशोधनाची गरज आहे. परंतु, ‘माचा’ हा मानसिक आरोग्यासाठी उपयुक्त ठरू शकतो, याबद्दल संशोधकांना आशा आहे. माचा केवळ चिंताच नाही तर शरीरातील इतर बरेच विकारही कमी करू शकतो आणि म्हणूनच शतकांपासून हा चहा औषधी म्हणून वापरला जात आहे. शोधात असे दिसून आले की, माचा चहाचे सेवन केल्याने तणाव कमी होण्यास मदत होते. माचा हा 90% कॅमेलिया सिनेन्सिस झाडांच्या नव्या पानांपासून बनवला जातो. त्यामुळे त्यामध्ये प्रचंड प्रमाणात अँटिऑक्सिडंटस् असतात. हे अँटिऑक्सिडंटस् शरीरातील फ्री रॅडिकल्सशी लढा देतात, ज्यामुळे शरीराचे नुकसान कमी होते. माचा हा अँटिऑक्सिडंटस्ने भरलेला असतो, जो शरीरातील विषारी घटकांशी लढण्यास मदत करतो आणि आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढवतो. ‘माचा’मधील घटक तणाव कमी करण्यात मदत करतात, ज्यामुळे मन शांत आणि स्थिर राहतं. नियमित ‘माचा’चे सेवन केल्याने चयापचय सुधारते आणि वजन कमी होण्यास मदत होते. या चहातील अँटिऑक्सिडंटस् फ्री रॅडिकल्सशी लढून त्वचेचं वृद्धत्व कमी करतो आणि शरीरातील इतर नुकसान टाळतात. एकंदरीत जपानी माचा चहा हे फक्त एक पेय नसून, आरोग्यासाठी प्रभावी औषध आहे.