

सेऊल : दक्षिण कोरियातील संशोधकांनी एक कृत्रिम स्नायू विकसित केला आहे, ज्याच्या सहाय्याने एखादा रोबो त्याच्या स्वतःच्या वजनाच्या अंदाजे 4,000 पट वजन उचलू शकतो. भविष्यातील मानवाकृती रोबोंमध्ये याचा वापर करता येईल, असे त्यांचे म्हणणे आहे. या स्नायूच्या डिझाईनमधील एक मुख्य यश म्हणजे गरजेनुसार लवचिक किंवा कडक होण्याची त्याची क्षमता. या संशोधन क्षेत्रात हे प्रथमच साध्य झाले आहे. शास्त्रज्ञांनी त्यांचे निष्कर्ष ‘अॅडव्हान्स्ड फंक्शनल मटेरिअल्स’ या जर्नलमध्ये प्रकाशित केलेल्या अभ्यासात मांडले आहेत.
उल्सान नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी (UNIST) येथील या अभ्यासाचे मुख्य लेखक, मेकॅनिकल इंजिनिअरिंगचे प्रोफेसर हून यूई जियोंग यांनी एका निवेदनात सांगितल की, ‘या संशोधनाने पारंपरिक कृत्रिम स्नायूंवरील मूलभूत मर्यादा दूर केली आहे, जिथे स्नायू एकतर अत्यंत ताणता येण्यासारखे, कमजोर किंवा मजबूत पण ताठ असायचे. आमचे संमिश्र मटेरियल दोन्ही गोष्टी करू शकते, ज्यामुळे अधिक अष्टपैलू मऊ रोबो, परिधान करता येणारी उपकरणे आणि सहज समजणारे मानव-यंत्र इंटरफेस विकसित करण्याचा मार्ग खुला झाला आहे.
‘ मऊ कृत्रिम स्नायू हे हलके, यांत्रिकद़ृष्ट्या लवचिक आणि अनेक दिशांनी हालचाल करण्यास सक्षम असल्याने ते मोठे परिवर्तनकारी मानले जातात. जेव्हा संशोधक ‘वर्क डेन्सिटी’ या शब्दाचा उल्लेख करतात, तेव्हा त्यांचा अर्थ असा असतो की, स्नायू प्रतियुनिट व्हॉल्यूम किती ऊर्जा देऊ शकतो. उच्च ताणण्याची क्षमता कायम ठेवून उच्च ‘वर्क डेन्सिटी’ मूल्ये प्राप्त करणे, हे कृत्रिम स्नायूंसाठी मोठे आव्हान असते. शास्त्रज्ञांनी त्यांच्या कृत्रिम स्नायूस ‘हाय-परफॉर्मन्स मॅग्नेटिक कंपोझिट अॅक्ट्युएटर’ असे वर्णन केले आहे. याचा अर्थ तो पॉलिमरचे एक जटिल रासायनिक संयोजन आहे, जे स्नायूंच्या ओढणे आणि सोडणे या क्रियांचे अनुकरण करण्यासाठी एकत्र जोडलेले आहेत.
यातील एका पॉलिमरची कडकपणाची पातळी बदलता येते. हे पॉलिमर एका मॅट्रिक्समध्ये बसवलेले आहे, ज्याच्या पृष्ठभागावर चुंबकीय सूक्ष्मकण आहेत, ज्यांना नियंत्रित केले जाऊ शकते. यामुळे स्नायूला बदलता येणार्या कडकपणामुळे सजीव केले जाऊ शकते आणि नियंत्रित केले जाऊ शकते, ज्यामुळे त्याची हालचाल शक्य होते. संशोधकांच्या या नवीन डिझाईनमध्ये दोन भिन्न क्रॉस लिंकिंग यंत्रणा समाविष्ट आहेत. 1. कोव्हॅलेंटली बाँडेड रासायनिक नेटवर्क (दोन किंवा अधिक अणू इलेक्ट्रॉन्सचे आदानप्रदान करून स्थिर रचना मिळवतात. 2. एक उलट करता येणारे, भौतिकरीत्या परस्परसंवादी नेटवर्क. संशोधकांनी अभ्यासात सांगितले की, अशा प्रकारे विकसित केलेल्या या दोन यंत्रणांमुळे स्नायूंना दीर्घकाळ काम करण्याची टिकाऊ क्षमता मिळते.