

रियाध : सौदी अरेबियातील नेफूद वाळवंटी प्रदेश एकेकाळी हिरवागार होता आणि तिथे मानवी वस्ती होती, याचे महत्त्वपूर्ण पुरावे बारा हजार वर्षे जुन्या खडकांवरील कोरीव कामांतून (रॉक आर्ट) समोर आले आहेत. या कोरीव कामांमध्ये उंटांच्या आकृत्या कोरलेल्या आढळल्या असून, यावरून या एकेकाळी समृद्ध असलेल्या भूप्रदेशात मानवी वस्ती होते, हे सिद्ध झाले आहे.
जेबेल मिस्मा, जेबेल अरनान आणि जेबेल मलेहा या नेफूद वाळवंटाच्या दक्षिण टोकाजवळील खडकाळ भागांमध्ये हे कोरीव काम आढळले आहे. पॅलेओअँथ्रोपॉलॉजिस्ट मायकल पेट्राग्लिया आणि त्यांच्या सहकार्यांनी नेचर कम्युनिकेशन्समध्ये प्रकाशित केलेल्या अहवालात या कोरीव कामाविषयी सविस्तर माहिती दिली आहे. ही कोरीव कामे 11,400 ते 12,800 वर्षांपूर्वीची असून, माणसाच्या आकाराची आहेत. यात उंटांचे कळप, हरीण, आयबेक्स (वन्य शेळीची प्रजाती) आणि ऑरोच्ससारख्या (गो वंशातील विलुप्त प्रजाती) वन्य प्राण्यांची चित्रे आहेत. ही चित्रे प्रदेशाची सीमा किंवा परिसरातील पाण्याचे स्रोत दर्शवण्यासाठी कोरली गेली असावीत, असा संशोधकांचा अंदाज आहे.
संशोधकांच्या ग्रीन अरेबिया प्रकल्पातून असे दिसून आले आहे की, सुमारे 19,000 वर्षांपूर्वी शेवटचा हिमनदी कालखंड संपल्यानंतर नेफूद हा प्रदेश पुन्हा ओला आणि हिरवागार बनला होता. जसजसा पाऊस वाढला आणि तात्पुरती वाळवंटी सरोवरे तयार झाली, तसतसे उंट, गझेल यांसारखे वन्य प्राणी येथे आले. त्यांच्या मागे सुमारे 12,000 वर्षांपूर्वी भटके मानव शिकारीसाठी येथे आले आणि त्यांनीच या खडकांवर ही चित्रे कोरली. शास्त्रज्ञांना खडकांवरील नैसर्गिक काळ्या वार्निशमध्ये चार टप्प्यांत कोरीव काम केलेले आढळले. पहिल्या टप्प्यात 12,000 वर्षांपूर्वी कोरलेल्या लहान, शैलीबद्ध महिलांच्या आकृत्या काढण्यात आल्या. दुसर्या टप्प्यात मोठ्या शैलीबद्ध मानवी आकृत्या रेखाटण्यात आल्या. सर्वाधिक आकर्षक असणार्या तिसर्या टप्प्यात नैसर्गिक शैलीत, 3 मीटर लांबीपर्यंतची भव्य प्राणी चित्रे कोरली गेली.
चौथ्या टप्प्यात कार्टूनिश आणि अधिक शैलीबद्ध प्राणी चित्रे आढळतात. या शोधाने पूर्व भूमध्यसागरीय भागातील लोकांसह या कलाकारांचे जवळचे संबंध उघडकीस आणले आहेत. या कोरीव कामाचा आकार आणि शैली ही एक पूर्णपणे नवीन घटना असल्याचे पेट्राग्लिया यांनी नमूद केले.