छतरपूर : सर्वकाही अंदाजाप्रमाणे घडले तर मध्य प्रदेशाबरोबरच देशासाठीही एक अत्यंत चांगली बातमी ठरू शकते. अंदाजानुसार या राज्यातील छतरपूरमधील जमिनीखाली तब्बल 3.42 कोटी कॅरेट हिरे दडले आहेत. मात्र, पर्यावरणाच्या द़ृष्टीने ही बाब जरा निराशाजनक आहे. कारण, हे हिरे काढण्यासाठी तब्बल 382.131 हेक्टर क्षेत्रात पसरलेल्या जंगलाबरोबरच तसेच हजारो झाडांचा बळी द्यावा लागणार आहे.
छतरपूर जिल्ह्यात बकस्वाहाच्या जंगलातील ज्या जमिनीखाली 3.42 कोटी कॅरेट हिरे दडले आहेत, तेथे सागाच्या 40 हजार झाडाबरोबरच शेकडो औषधी झाडेही आहेत. मात्र, प्रशासनाच्या दाव्यानुसार पन्ना जिल्ह्यात देशातील सर्वात मोठे हिर्यांचे भांडार आहे. येथे जमिनीखाली 22 लाख कॅरेट हिरे दडले आहेत. यापैकी सुमारे 13 लाख कॅरेट हिरे यापूर्वीच काढण्यात आले आहेत. अजूनही येथे जमिनीखाली 9 लाख कॅरेट हिरे दडले आहेत. यानंतर बकस्वाहा येथेही जमिनीखाली 15 पटीने जास्त हिरे आहेत.
हिर्यांचे भांडार असलेल्या या जमिनीच्या सर्वेक्षणास सुमारे 20 वर्षांपूर्वीच सुरुवात करण्यात आली होती. बंदर डायमंड प्रोजेक्टअंतर्गत हे सर्वेक्षण करण्यात आले होते. सरकारने त्याचा दोन वर्षांपूर्वीच लिलाव केला. यामध्ये अनेक कंपन्यांनी भाग घेतला होता.