लिमा : पेरू देशातील वाळवंटी मैदानात प्राचीन काळात भव्य रेषांच्या सहाय्याने काही आकृत्या निर्माण करण्यात आलेल्या आहेत. त्यांना ‘नाज्का लाईन्स’ म्हणून संबोधले जात असते. या आकृत्या आकाशातून किंवा उंच ठिकाणांवरून पाहिल्यावरच समजतात. अशा भव्य आकृत्या व आखीव सरळ रेषांची कशी निर्मिती झाली, याचे कुतूहल आजही कायम आहे. आता ‘एआय’ म्हणजेच ‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स’च्या सहाय्याने तिथे यापूर्वी पाहण्यात न आलेल्या तीनशेपेक्षाही अधिक नाज्का लाईन्स शोधण्यात आल्या आहेत. त्यामध्ये चक्क एलियनसारख्या दिसणार्या काही मानवाकृतींचाही समावेश आहे. शिवाय 72 फूट लांबीची व तोंडात चाकू धरलेल्या किलर व्हेलचीही आकृती यामध्ये आहे.
मानवनिर्मित कोरीव आकृत्या
या परिसरात आजपर्यंत ज्ञात असलेल्या आकृत्यांच्या दुप्पट नव्या आकृत्या केवळ सहा महिन्यांच्या काळात ‘एआय’च्या सहाय्याने शोधण्यात आल्या आहेत. पेरूच्या नाज्का वाळवंटातील सपाट मैदानात 440 चौरस किलोमीटरच्या परिसरातील जमिनीवर या मानवनिर्मित कोरीव आकृत्या आहेत. इसवीसनपूर्व 200 ते इसवी सन 500 या काळात त्यांची निर्मिती झाली असावी, असे अनुमान आहे. सुमारे दोन हजार वर्षांपूर्वी या भव्य आकृत्या त्यावेळेच्या मानवांनी कशा बनवल्या असाव्यात व त्या अधिक उंचीवरून पाहण्याची सुविधा त्यांना कशी मिळाली असावी, हे एक गूढच आहे. इंका संस्कृतीच्या पूर्वकालीन मानवांनी या आकृत्या बनवल्या असून, त्यांना नाज्का संस्कृती असे म्हटले जाते. 1920 च्या दशकात विमानातून जाणार्या प्रवाशांना सर्वप्रथम अशा आकृत्या तिथे आढळल्या व ते चकितच झाले. त्यानंतर संशोधकांनी तिथे अशा 420 आकृत्या शोधल्या होत्या. त्यापैकी बहुतांश आकृत्या या गेल्या वीस वर्षांमध्ये सॅटेलाईटच्या मदतीने शोधण्यात यश आले होते. सध्या अनेक आकृत्या पुसट झाल्याने त्या मानवी स्पष्ट डोळ्यांनी दिसणे कठीण बनले आहे.
नव्या 303 आकृत्यांचा शोध
आता झालेल्या नव्या संशोधनाची माहिती ‘पीएनएएस’ या नियतकालिकात प्रसिद्ध करण्यात आली आहे. या संशोधनासाठी एका एआय मॉडेलचा वापर करण्यात आला. या मशिनला सॅटेलाईट छायाचित्रांमधील पुसट झालेल्या रेषा, आकृत्या आणि अधूनमधून निसटलेले भाग जोडून अशा आकृत्या शोधण्यासाठी प्रशिक्षण दिले होते. मानवापेक्षा वीस पट अधिक वेगाने अशा लाईन्स शोधण्याची क्षमता या मशिनमध्ये होती. त्याने या नव्या आकृत्या शोधल्या व संशोधकांनी सप्टेंबर 2022 ते फेब्रुवारी 2023 या काळात प्रत्यक्ष त्या ठिकाणी जाऊन अशा 303 आकृत्यांची पुष्टीही केली. त्यामध्ये मानवी आकृत्या, डोकी, मासे, पक्षी, मांजर, समारंभाचे द़ृश्य, मानव-पशू संपर्क अशा आकृत्यांचा समावेश आहे. यामध्ये चक्क एलियनसारख्या वाटणार्या मानवी आकृत्यांचाही समावेश आहे, हे विशेष!