वॉशिंग्टन : भारतासारख्या उष्ण हवामानाच्या देशात घाम येणे हे नित्याचीच बाब असते. घामाच्या दुर्गंधीने अनेक लोक त्रस्तही होत असतात. त्यामुळेच डिओडरंट म्हणजे दुर्गंधीनाशकांचे अलीकडे पेवच फुटले आहे. मात्र, त्यातील रसायनांचा विचार करता ते शरीराला सुरक्षित असतातच असे नाही. त्यामुळे आता अमेरिकन वैज्ञानिकांनी घाम शोषून पुन्हा तो वाळवला जाईल, अशा प्रकारचे कापड तयार केले आहे. मायक्रोफ्लुइडिक तंत्रज्ञान त्यामध्ये वापरण्यात आले आहे. हे नवीन पद्धतीचे कापड मानवी त्वचेसारखे काम करते त्यात जादाचा घाम हा द्रवबिंदूत रूपांतरित करून बाहेर टाकला जातो. डेव्हिस येथील कॅलिफोर्निया विद्यापीठातील प्रा. तिंगरूई पॅन यांनी हे नवीन प्रकारचे कापड बनवले आहे.
सतत व्यायाम करणारे लोक, अॅथलिट्स व कपडे उत्पादक अशाप्रकारे घाम बाहेर काढून त्वचेला मोकळे करण्याची संधी देणार्या कापडाची आतुरतेने वाट बघत होते. कॉटनचे कपडे घाम शोषून घेतात हे खरे असले, तरी खूप घाम शोषल्यानंतर त्यांची क्षमता संपते व ते मर्यादेपलीकडे तो शोषून घेऊ शकत नाहीत. आता नवीन शोधण्यात आलेल्या कापडात असे घडत नाही. जलावरोधक धागे व जलाकर्षक धागे एकत्र शिवून त्यांच्या मदतीने मायक्रोफ्लुइडिक गुणधर्म असलेले कापड तयार करण्यात संशोधक सियुआन झिंग व जिया जियांग यांनी यश मिळवले आहे. यात कापडाची एक बाजू घाम शोषून घेते व दुसरी बाजू तो बाहेर टाकते. झिंग यांनी सांगितले की, या प्रयोगात आम्ही कुठलेही फॅशनेबल धागे वापरलेले नाहीत. त्यामुळे हे कापड सर्वांना वापरता येईल. जलाकर्षणाने हे धागे केवळ पाणी ओढून घेतात एवढेच नाही, तर आजूबाजूच्या धाग्यांमधील जलावरोधक क्षमताही हे पाणी विशिष्ट मार्गिकेतून बाहेर टाकण्यास मदत करते. पारंपरिक धाग्यांमध्ये पाणी शोषण्याची कापडाची क्षमता संपली की ते पुढे तयार होणारा घाम शोषून घेत नाहीत; पण येथे तसे घडत नाही. कारण, शोषलेले पाणी बाहेर टाकले जात असते. त्यामुळे सगळे कापड पुन्हा कोरडे होते. यात शरीराच्या ज्या भागात जास्त घाम येतो त्या ठिकाणी निवडक पद्धतीने या धाग्यांची जुळणी करून घाम बाहेर टाकता येऊ शकतो.