प्लुटो ला पुन्हा मिळणार ग्रहाचा दर्जा? | पुढारी

प्लुटो ला पुन्हा मिळणार ग्रहाचा दर्जा?

वॉशिंग्टन : पृथ्वीवर बसून माणूस काय ठरवतो याचा अंतराळातील ग्रह-तार्‍यांना कोणताही फरक पडत नसतो. मात्र, तरीही 2006 मध्ये काही खगोलशास्त्रज्ञांनी एकत्र येऊन आपल्या ग्रहमालिकेतील एक ग्रह असलेल्या प्लुटो चा ‘ग्रह’ पदाचा दर्जा काढून घेतला आणि त्याला ‘खुजा ग्रह’ ठरवले.

आंतरराष्ट्रीय खगोलीय संघाने (आयएयू) 2006 मध्ये म्हटले की प्लुटोला पूर्ण ग्रहाच्या श्रेणीत ठेवता येणार नाही, त्याच्यामध्ये तशी लक्षणे नाहीत. त्यामुळे त्याला ‘ड्वॉर्फ प्लॅनेट’ म्हणजेच ‘खुजा ग्रहा’च्या श्रेणीत टाकण्यात आले. मात्र, आता पुन्हा एकदा त्याला ‘ग्रह’ ठरवून आपल्या ग्रहमालिकेतील नववा ग्रह बनवण्यात येऊ शकते.

‘आयएयू’ने त्यावेळी दावा केला होता की प्लुटोला एक पूर्ण ग्रह म्हणून वर्गीकृत करण्यासाठी आवश्यक असलेल्या तीन बाबींची पूर्तता होत नाही. मात्र, आता ‘इकारस’ नावाच्या वैज्ञानिक नियतकालिकामध्ये काही खगोलशास्त्रज्ञांनी म्हटले आहे की ‘आयएयू’ने प्लुटोबाबतची आपली धारणा बदलणे गरजेचे आहे.

या संस्थेने ग्रहांबाबतची जी गैरवैज्ञानिक व्याख्या पुढे आणली आहे ती रद्द केली पाहिजे. ‘आयएयू’च्या नियमानुसार एखाद्या खगोलास ग्रह मानण्यासाठी आधी त्याचा आकार गोल असणे गरजेचे आहे. तो एखाद्या तार्‍याची प्रदक्षिणा घालत असणेही गरजेचे आहे. तसेच त्याचे आपल्या कक्षेतील अन्य वस्तूंबरोबरचे गुरुत्वाकर्षण स्थान समान असता कामा नये.

अर्थात जगभरातील अनेक विद्यापीठे, वेधशाळा, संशोधन केंद्रांनी या निर्णयावर टीका केली होती. या विषयावर पाच वर्षे अध्ययन केल्यानंतर अनेक संशोधकांनी ‘आयएयू’च्या निर्णयाला घाईगडबडीत घेतलेला निर्णय ठरवले आहे. हा निर्णय ‘अवैज्ञानिक’ असल्याचेही अनेकांनी दावा केला आहे. ‘नासा’चे माजी प्रशासक जिम ब्रिडेनस्टाईन, प्लुटोवरील ‘न्यू होरायझन’ मोहिमेचे नेतृत्व करणारे ‘नासा’चे वैज्ञानिक एलन स्टर्न आदी अनेकांनी ‘आम्ही प्लुटो ला एक ग्रहच मानतो’ असे ठासून सांगितले होते.

Back to top button