मायग्रेनचा त्रास टाळण्यासाठी ‘हे’ पदार्थ टाळा! | पुढारी

मायग्रेनचा त्रास टाळण्यासाठी ‘हे’ पदार्थ टाळा!

अमेरिकन मायग्रेन फाऊंडेशनच्या माहितीनुसार जगभरात शंभर कोटी लोक मायग्रेनची शिकार आहेत. ‘मायग्रेन’ हा डोकेदुखीचा विकार असून त्यामध्ये डोक्याचा अर्धा भाग ठणकतो. या वेदना काही तासांपासून ते काही दिवसांपर्यंतही राहू शकतात. हा विकार अनुवंशिक असल्याचेही मानले जाते. मायग्रेनसाठी अनेक गोष्टी कारणीभूत होत असतात. त्यामध्ये तीव्र प्रकाश, ध्वनी, गंध, चिंता, तणाव, औषधे आदींचा समावेश होतो. तसेच खाण्या-पिण्याच्याही काही गोष्टी यासाठी कारणीभूत होत असतात ज्यामुळे मायग्रेनच्या अ‍ॅटॅकला उत्तेजन मिळते. अशाच काही पदार्थांची ही माहिती…

मद्य : नॅशनल लायब्ररी ऑफ मेडिसिनमध्ये प्रकाशित एका संशोधनानुसार 35 टक्के रुग्णांना दारू पिल्यानंतर मायग्रेनचा त्रास होतो. रेड वाईन पिणार्‍या 77 टक्के लोकांना मायग्रेनचा त्रास होतो. मद्यपानानंतर शरीरात डीहायड्रेशन होते (पाण्याचे प्रमाण कमी होणे), त्यामुळे डोकेदुखी सुरू होते.

चॉकलेट : दारूनंतर मायग्रेनला सर्वाधिक ‘ट्रिगर’ करणारा पदार्थ म्हणजे चॉकलेट. अमेरिकन मायग्रेन फाऊंडेशनच्या माहितीनुसार मायग्रेनने पीडित 22 टक्के लोकांना चॉकलेटमुळे त्रास होतो. चॉकलेटमध्ये कॅफिनबरोबरच बीटा-फेनिलेथाईलामाईन हे रसायन असते. त्यामुळे मायग्रेनच्या वेदना वाढतात.

कॅफिन : जर तुम्ही मायग्रेनचा त्रास होत असतानाही चहा-कॉफी पीत असाल तर सावध व्हा. कॅफिनच्या अधिक प्रमाणातील सेवनाने डोकेदुखी वाढू शकते. कॅफिन सर्वाधिक प्रमाणात चहा, कॉफी आणि चॉकलेटमध्ये आढळते.

आर्टिफिशियल स्वीटनर : बाजारात मिळणार्‍या बहुतांश पदार्थांमध्ये आर्टिफिशियल स्वीटनरचा वापर केला जातो. खाद्यपदार्थांमधील गोड चव वाढविण्यासाठी त्याचा उपयोग होतो. मात्र, त्यामधील एस्पार्टेम केमिकल मायग्रेनला वाढवते.

एमएसजी : मोनोसोडियम ग्लूटामेट (एमएसजी) खाद्यपदार्थांचा स्वाद वाढवत असते. त्याचा बहुतांशी वापर चायनीज पदार्थ, सूप आणि मांसाहारी पदार्थांमध्ये केला जातो. तसे पाहता ते खाण्यासाठी सुरक्षितच मानले जाते, मात्र मायग्रेनच्या रुग्णांसाठी ते हानिकारक ठरते.

प्रोसेस्ड मीट : हॅम, हॉट डॉग आणि सॉसेजसारख्या मांसाहारी पदार्थांमध्ये अनेक प्रकारची रसायने, कृत्रिम रंग आणि प्रिझर्व्हेटिव्ह असतात. ते आपल्या मेंदूसाठी चांगले नसतात. मायग्रेनच्या रुग्णांनी असे प्रक्रिया केलेले मांस खाणे हानिकारक ठरू शकते.

चीज : शिळ्या चीजमध्ये टायरामाईन नावाचा पदार्थ असतो. त्यामुळे मायग्रेन व अन्य प्रकारची डोकेदुखी उद्भवते. फेटा, ब्लू चीज आणि परमेजनमध्ये टायरामाईन सर्वाधिक प्रमाणात असते.

अधिक मिठाचे पदार्थ : अधिक मीठ म्हणजे अधिक सोडियम. शरीरात सोडियमचे अधिक प्रमाण रक्‍तदाब वाढवते. त्यामुळे डोकेदुखी आणि मायग्रेनचा त्रास होऊ शकतो.

फ्रोजन फूडस् : आईस्क्रीम आणि स्लश खाल्ल्याने डोकेदुखी आणखी तीव— होऊ शकते. व्यायाम केल्यावर लगेचच थंड पदार्थ खाल्ल्यानेही मायग्रेनचा त्रास होतो.

लोणचे : दीर्घकाळ साठवून ठेवलेले लोणचे किंवा फर्मेंटिड फूड खाल्ल्यानेही मायग्रेनचा त्रास होऊ शकतो. त्यामध्येही टायरामाईन रसायनाचे प्रमाण अधिक असते. कोणतेही लोणचे, किमची, कोम्बूचा आदी पदार्थ खाल्ल्याने मायग्रेनचा त्रास होतो.

Back to top button