मानवी अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी चंद्रावर बंकर?

वॉशिंग्टन : पृथ्वीला किंवा पर्यायाने जीवसृष्टी व मानवांना वेगवेगळ्या प्रकारचे धोके नेहमीच भेडसावत असतात. लघुग्रहाची धडक, नैसर्गिक आपत्ती यांच्यापासून ते अणू युद्धापर्यंत अनेक प्रकारचे धोके मानव प्रजातीसमोर आहेत. त्यापासून मानवाचे अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी कोणकोणते उपाय करता येतील हे संशोधकही पाहत असतात. आता संशोधकांनी एका अशा भूमिगत बंकरचे डिझाईन बनवले आहे जे चंद्रावर बनवले जाऊ शकते. या बंकरमध्ये मानवी अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठीच्या सर्व गोष्टी सुरक्षितपणे साठवून ठेवल्या जाऊ शकतील.
महाविनाशापासून मानवाचे संरक्षण करण्यासाठी हे बंकर वैश्विक विमा पॉलिसीच्या रूपाने काम करू शकते. हा प्रोजेक्ट पूर्ण करण्यासाठी 250 रॉकेट लाँच करावी लागतील. संशोधकांनी म्हटले आहे की चंद्रावर या बंकरचे काम सौरऊर्जेच्या सहाय्याने चालेल आणि पृथ्वीवर विनाश ओढवला तर चंद्रावर ते मानवी संस्कृतीचे रक्षण करील.
या बंकरमध्ये वेगवेगळ्या वनस्पतींच्या बिया, मानवी शुक्राणू, स्त्रीबीज साठवून ठेवले जातील व त्यासाठी वेगवेगळे विभाग असतील. अमेरिकेच्या अॅरिझोना युनिव्हर्सिटीतील प्रा. जेकान थांगा यांनी याबाबतची माहिती दिली आहे. चंद्रावरील थंड वातावरण गरजेच्या वस्तू सुरक्षित ठेवण्यासाठी पोषक असल्याचे त्यांनी सांगितले. असाच प्रकार यापूर्वी पृथ्वीवरही करण्यात आलेला आहे.
नॉर्वेच्या स्वालबार्डमधील एका बीज बँकेत महाविनाशातून बचावणारी तिजोरी बनवलेली आहे. त्यामध्ये हजारो प्रकारच्या बिया साठवून ठेवलेल्या आहेत. मात्र, पृथ्वीवरील सीड बँक अशी केवळ पृथ्वीवरच ठेवणे धोक्याचे ठरू शकते. त्याऐवजी 67 लाख प्रजातींच्या बिया, शुक्राणू, स्त्रीबीज हे चंद्रावरील बंकरमध्ये ठेवल्यास पृथ्वीवरील महाविनाशानंतरही नवे सृजन होऊ शकेल.