तणावाबाबत वेळीच सावध करणारे घड्याळ! | पुढारी

तणावाबाबत वेळीच सावध करणारे घड्याळ!

लास वेगास : एखादे घड्याळ मनगटावर बांधलेले आहे; पण त्यावर काटे किंवा आकडेच नाहीत, असे दिसल्यावर आपल्याला आश्चर्य वाटू शकते. मात्र, आता बिनकाट्यांचे हे ‘नोवॉच’ घड्याळ आपल्याला वेळीच तणावाबाबत सावध करू शकते. ते स्ट्रेस हार्मोन म्हणजेच तणावाशी संबंधित असलेले हार्मोन ‘कार्टिसोल’चा स्तर वाढला तर त्याचा छडा घामाद्वारे लावू शकते. हा स्तर वाढला की हे उपकरण कंपने निर्माण करते व तुम्हाला सावध करून काही उपाय सूचवते.

जर शरीरात कार्टिसोलचा स्तर वाढला तर ते मनगटावर व्हायब्रेट होऊ लागते. सोबतच ऑडिओद्वारे सल्ला देते की आता दीर्घ श्वास घ्या, कामाच्या ठिकाणावरून उठून थोडे चालायला लागा. वास्तविक कार्टिसोलचा स्तर हा लठ्ठपणा, अनिद्रा आणि हृदयाशी संबंधित आजारांचे कारण असतो. त्याचा स्तर वाढल्यानंतर मनगटाला आलेल्या घामाद्वारे नोवॉच त्याचा छडा लावते. नोवॉचमध्ये लावलेले इलेक्ट्रिकल सेन्सर डेटा अल्गोरिदमसोबत तणावाचे विश्लेषण करते.

जर तणावाचा स्तर डिजिटल पद्धतीने संख्येच्या आधारावर डिस्प्ले केला गेला तर तोही तणावाचा स्तर वाढवतो. त्यामुळे नोवॉचमध्ये डिस्प्ले फिचर ठेवले गेले नाही. ते आरोग्याचा डेटा सेव्ह करते, परंतु यूजरला त्वरित दाखवत नाही. लास वेगासमध्ये होणार्‍या सीईएस कॉन्फरन्समध्ये या घड्याळाचे प्रदर्शन करण्यात येणार आहे. सुमारे 57 हजार रुपयांचे नोवॉच पुढील वर्षी मार्चपर्यंत बाजारात येईल.

Back to top button