जुळ्या भावंडांचा जन्म दोन वेगवेगळ्या वर्षात! | पुढारी

जुळ्या भावंडांचा जन्म दोन वेगवेगळ्या वर्षात!

वॉशिंग्टन : जन्म आणि मृत्यू हे आपल्या हातात नसतात. त्यामुळे ते कधी व कसे होतील हे काही सांगता येत नाही. आता अमेरिकेत जुळ्या भावंडांचा जन्म झाला आहे; पण एकाच्या जन्मतारखेत 2021 हे वर्ष असून दुसर्‍याच्या जन्मतारखेत 2022! दोन वेगवेगळ्या वर्षात हे जुळे जन्माला आले.

पहिल्या बाळाचा जन्म 31 डिसेंबर रोजी रात्री पावणेबारा वाजता झाला, तर दुसर्‍या बाळाचा जन्म पंधरा मिनिटांनी म्हणजेच मध्यरात्री बारा वाजता, 1 जानेवारी 2022 हे नवे वर्ष सुरू झाल्यावर झाला. याबाबत नॅटीविदाद मेडिकल सेंटरने फेसबुकवरून माहिती दिली आहे. आयलिन आणि अल्फ्रेडो ट्रुजिलो नावाच्या ह्या जुळ्या भावंडांचा जन्म दोन वेगवेगळ्या वर्षात झाला.

31 डिसेंबरला रात्री पावणेबारा वाजता मुलगा अल्फ्रेडोचा जन्म झाला तर नव्या वर्षात जन्मणारी आयलिन ही पहिलेच बाळ ठरली. त्यांची आई फातिमा माद्रिगल यांनी याबाबत आनंद व्यक्त केला. त्यांनी सांगितले, मी आनंदी आहे की मला जुळी मुलं झाली आणि महत्त्वाचे म्हणजे जुळे असूनही त्यांचे वाढदिवस वेगवेगळ्या वर्षात आहेत!

Back to top button