इलेक्ट्रॉनिक शोमध्ये भन्नाट उपकरणे! - पुढारी

इलेक्ट्रॉनिक शोमध्ये भन्नाट उपकरणे!

कन्झ्युमर इलेक्ट्रॉनिक शोचे उद्घाटन बुधवार, दि. 5 जानेवारीला अमेरिकेतील लास वेगास शहरात होत आहे. 7 जानेवारीपर्यंत सुरू राहणार्‍या या इलेक्ट्रॉनिक शोमध्ये अनेक भन्नाट गॅझेटस्, उपकरणे व तंत्रज्ञानाचे थक्क करणारे नमुने सादर करण्यात येत आहेत. अशाच काही वस्तूंची ही माहिती…

अम्ब्रेला मॉनिटर

‘एस प्ले’ नावाच्या कंपनीने अम्ब्रेला मॉनिटरवर दीर्घकाळापासून काम केले आहे. हा मॉनिटर या शोमध्ये लाँच होईल. हा एक प्रकारचा पोर्टेबल डिस्प्ले आणि प्रोजेक्टर आहे. एखाद्या छत्रीप्रमाणे तो उघडला जातो व त्याच्या समोरच्या बाजूस कापडी स्क्रीन असते. या स्क्रीनवर द़ृश्ये दिसू लागतात. मागेे जो हँडलचा भाग असतो तिथे प्रोजेक्टर लावलेला असतो. यामध्ये स्टेरीओ स्पीकर, एचडीएमआय पोर्ट, वायरलेस कनेक्शनसह अनेक प्रकारची कनेक्टिव्हिटी देण्यात आली आहे. या उपकरणाला आपण लॅपटॉप, स्मार्टफोनशीही कनेक्ट करू शकतो. यामधील रिचार्जेबल बॅटरी चार तासांचा बॅकअप देते.

इलेक्ट्रिक पेन

या पेनची खासियत म्हणजे हा पेन जिथे जिथे चालतो तिथे एक इलेक्ट्रिक सर्किट बनवतो. याचा अर्थ त्याने ओढलेली प्रत्येक रेष ही एखाद्या वायरसारखे काम करते. त्यामधून विजेचा प्रवाह वाहतो. हा पेन ज्या एरियात चालतो तिथे एक वायरची लेयर बनवतो. त्याला कोणत्याही उत्पादनामध्ये वापरता येऊ शकते. या पेनने एखादे लाईट पिलरचे चित्र बनवले तर त्याचीही थ्रीडी इमेज तयार होते. या पेनमुळे इलेक्ट्रिक कनेक्शन करणे सोपे होते.

थ्री-डी एज्युकेशन स्क्रीन

तंत्रज्ञान सातत्याने प्रगती करीत आहे. पूर्वी केवळ पुस्तकांच्या माध्यमातूनच मुलांना शिक्षण दिले जात असे. आता ‘प्रॅक्टिकल’वर अधिक भर दिला जातो. ‘सीईएस’मध्ये ‘एज्युकेशन थ्री-डी स्क्रीन’ लाँच करण्यात येत आहे. त्याला रिअल फ्यूचर स्क्रीनही म्हटले जात आहे. इंटरॅक्टिव्ह आणि डायनॅमिक एज्युकेशनसाठी ही स्क्रीन अतिशय उपयुक्त ठरू शकते. त्यामध्ये विद्यार्थी थेट ‘थ्री-डी इमेज’ बनवू शकतील. उदा. वाळूची टेकडी, डोंगराचा नकाशा या स्क्रीनवर सहजपणे बनवता येईल.

होम रोबो

सॅमसंग कंपनी गेल्या अनेक वर्षांपासून घरगुती वापराच्या ‘होम असिस्टंट रोबो’वर काम करीत आहे. तो छोट्या छोट्या घरगुती कामांमध्ये आपली मदत करील. तो आपल्याला पाणी आणून देईल, कपडे वॉशिंग मशिनमध्ये टाकेल, फुलदाणीमधील फुले बदलेल, भांडी योग्य ठिकाणी ठेवील.

एआर पेंटिंग

कलेच्या क्षेत्रातही आता अद्ययावत तंत्रज्ञानाने क्रांतिकारक बदल घडून येऊ शकतात. त्यामध्ये पेंटिंगचाही समावेश आहे. या आधुनिक पेंटिंगची खासियत म्हणजे ते कागदावर असेल; पण ज्यावेळी आपण त्याला फोन किंवा टॅबलेटने स्कॅन करू, त्यावेळी ते जणू काही जिवंतच होईल! याचा अर्थ त्यामधील आकृत्या चालू-फिरू लागतील. पेंटिंगमधील एखादा मुलगा चालू लागेल, नाचू लागेल. एक दगड दुसर्‍या दगडावरून उडी मारेल. अन्यही काही हालचाली यामधून पाहायला मिळतील.

Back to top button