वॉशिंग्टन : अमेरिकेच्या टेक्सासमध्ये महाबली हनुमानाच्या 90 फूट उंचीच्या कांस्य मूर्तीचे नुकतेच अनावरण करण्यात आले. या भव्य मूर्तीचे नामकरण ‘स्टॅच्यू ऑफ युनियन’ असे करण्यात आले आहे. कुठूनही बघितले तरी नजरेस पडणारी ‘स्टॅच्यू ऑफ युनियन’ ही मूर्ती अमेरिकेतील तिसरी सर्वात उंच मूर्ती ठरली आहे. या भव्य पुतळ्याच्या अनावरण सोहळ्यादिवशी आयोजकांनी सांगितले की, हे शिल्प अमेरिकेच्या सांस्कृतिक आणि आध्यात्मिक वर्तुळातील मैलाचा दगड आहे.
‘स्टॅच्यू ऑफ युनियन’ ही मूर्ती टेक्सासमधील शुगर लँड येथील श्री अष्टलक्ष्मी मंदिरात आहे. या मूर्तीच्या नावावर असलेल्या संकेतस्थळावर या मूर्तीविषयी माहिती देण्यात आलेली आहे. या माहितीत म्हटले आहे की, ही मूर्ती आध्यात्मिक आनंद देणारी, मनाला शांती देणारी आणि आत्म्याला मार्गदर्शक ठरणारी आहे. या भव्य मूर्तीला ‘स्टॅच्यू ऑफ युनियन’ हे नाव का देण्यात आले याविषयी खुलासा करताना या संकेतस्थळावर म्हटले आहे की, ‘द स्टॅच्यू ऑफ युनियन’ ही उत्तर अमेरिकेतील भगवान हनुमानाची सर्वात उंच मूर्ती आहे. भगवान हनुमान हे शक्ती, भक्ती आणि निःस्वार्थ सेवेचे मूर्त स्वरूप आहेत. भगवान हनुमानाने भगवान श्रीराम आणि माता सीतेला एकत्र आणले, म्हणून या मूर्तीला ‘स्टॅच्यू ऑफ युनियन’ हे नाव देण्यात आले आहे. ही अमेरिकेतील प्रचंड उंच मूर्ती आहे. स्टॅच्यू ऑफ लिबर्टी (151 फूट) आणि फ्लोरिडामधील पेगासस आणि ड्रॅगन (110 फूट) नंतर या मूर्तीचा उंचीमध्ये तिसरा क्रमांक लागतो. त्यापूर्वी ‘अवर लेडी ऑफ द रॉकीज’ हा पुतळा अमेरिकेतील सर्वात उंच तिसर्या क्रमांकाचा पुतळा होता, जो 88.6 फूट आहे. आयोजकांनी प्रसिद्ध केलेल्या निवेदनानुसार, हा पुतळा पद्मभूषण पुरस्कार विजेते आणि वैदिक विद्वान चिन्ना जेयर स्वामीजी यांच्या संकल्पनेवर आधारित आहे. उत्तर अमेरिकेसाठी एक आध्यात्मिक केंद्र म्हणून त्यांनी या प्रकल्पाची कल्पना केली आहे, असे आयोजकांनी म्हटले आहे. 15 ते 18 ऑगस्ट दरम्यान आयोजित भव्य तीन दिवसीय प्राणप्रतिष्ठा सोहळ्यात या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले. या कार्यक्रमात हेलिकॉप्टरने पुतळ्यावर पुष्पवृष्टी, पवित्र जल शिंपडणे याबरोबर भगवान हनुमानाच्या गळ्यात 72 फूट लांबीची पुष्पमाला घालण्यात आली. हजारो भाविकांनी श्रीराम आणि हनुमानाच्या नावाचा जयघोष केला.