क्वालालंपूर : कुणाचे भाग्य कधी व कसे उघडेल हे काही सांगता येत नाही. मलेशियातील एका महिलेचे भाग्यही असे अचानक उदयाला आले. अइदा जुरिना लोंग नावाच्या या महिलेला समुद्रकिनारी एक विचित्र 'कचरा' दिसून आला. हा 'कचरा' नसून तो व्हेल माशाची उलटी असल्याचे निष्पन्न झाले. व्हेलच्या उलटीला कोट्यवधी रुपयांची किंमत मिळत असते. त्यामुळे त्याला 'तरंगते सोने'ही म्हटले जाते!
एका मच्छीमार कुटुंबातील अइदा मासेविक्री करून उपजीविका करते. बुधवारचा दिवस तिच्यासाठी खासच ठरला. ती मासेमारीसाठी समुद्रकिनारी गेली असता तिला किनार्यावर एक वेगळा वाटणारा 'कचरा' दिसला. समुद्राच्या लाटांबरोबर हा कचरा वाहून आला असावा असे तिला आधी वाटले. तिने दगडासारखी दिसणारी वस्तू पाण्यातून उचलून बाहेर आणली व किनार्यावर ठेवून दिली. त्यावेळी ही व्हेल माशाची उलटी आहे हे तिला माहिती नव्हते. तिने याबाबत आपल्या वडिलांना सांगितल्यावर ही वस्तू व्हेलची उलटी असल्याचा उलगडा झाला आणि तिच्या आनंदाला आकाश ठेंगणे झाले! तिने दुसर्या दिवशीच पुन्हा किनार्यावर जाऊन ही वस्तू घरी आणली.
आता मलेशियाचा मत्स्यपालन विभाग लवकरच या उलटीची तपासणी करून तिची किंमत ठरवणार आहे. ही उलटी मोठ्या आकाराची असून तिला कोट्यवधी रुपयांची किंमत मिळेल असा अंदाज आहे. इंग्रजीत या उलटीला 'अॅम्बेर्ग्रीस' असे म्हटले जाते. हा घन, मेणाचासारखा आणि ज्वलनशील पदार्थ असतो. परफ्यूम म्हणजेच सुगंधी द्रव्ये तयार करण्याच्या उद्योगात त्याचा वापर केला जातो. त्यामुळे परफ्यूमचा सुगंध दीर्घकाळ टिकून राहतो.