आकाशगंगेतील कृष्णविवरातून होत आहे उत्सर्जन | पुढारी

आकाशगंगेतील कृष्णविवरातून होत आहे उत्सर्जन

वॉशिंग्टनः प्रत्येक आकाशगंगेच्या मध्यभागी एक कृष्णविवर असते. आपल्या ‘मिल्की वे’ नावाच्या आकाशगंगेच्या मध्यभागीही एक कृष्णविवर आहे. ‘नासा’च्या संशोधकांनी म्हटले आहे की या शक्‍तिशाली कृष्णविवरातून उत्सर्जन होत आहे.

‘सॅजिटेरियस ए’ नावाचे हे कृष्णविवर वेळोवेळी एखाद्या ब्लोटॉर्चसारखे जेट उत्सर्जित करते. ही घटना हजारो वर्षांमधून एकदा होते. या कृष्णविवरातून होणार्‍या उत्सर्जनामुळे अंतराळात हायड्रोजनने भरलेल्या ढगांची निर्मिती होते.

‘सॅजिटेरियस ए’ कृष्णविवर आपल्या आकाशगंगेच्या केंद्रात आहे. त्याचे द्रव्यमान आपल्या सूर्याच्या द्रव्यमानाच्या 4.1 दशलक्ष पट अधिक आहे. चॅपेल हिलमधील उत्तर कॅरोलिना विद्यापीठाचे प्रा. गेराल्ड सेसिल यांच्या नेतृत्वाखाली संशोधकांच्या एका पथकाने त्याच्यामधून होणार्‍या उत्सर्जनाचा छडा लावला आहे. त्यांनी हबल स्पेस टेलिस्कोप व अन्य काही दुर्बिणींच्या निरीक्षणांचा या संशोधनासाठी वापर केला.

या शोधासाठी हबल आणि चंद्र टेलिस्कोपबरोबर चिलीच्या अटाकामा वाळवंटातील ‘एएलएमए रेडिओ टेलिस्कोप’ आणि न्यू मेक्सिकोच्या व्हेरी लार्ज एरेकडूनही डेटा घेण्यात आला. हबलने आतापर्यंत उत्सर्जित जेटची प्रतिमा टिपलेली नाही. त्यामुळे त्याला ‘फँटम जेट’ म्हटले जात आहे. मात्र, हबलने त्याचे पुरावे शोधण्यास मदत केली आहे. या उत्सर्जनाच्या परिणामस्वरूप विशाल हायड्रोजन ढग निर्माण होत असल्याने त्याचे पुरावे दिसून येत आहेत.

Back to top button