पिरॅमिडसाठी मोठ्या शिळा कशा आणल्या होत्या?

पिरॅमिडसाठी मोठ्या शिळा कशा आणल्या होत्या?
Published on
Updated on

कैरो : जगातील आश्चर्यांमध्ये इजिप्तमधील हजारो वर्षांपूर्वी बांधलेल्या भव्य पिरॅमिडस्चा समावेश होतो. या पिरॅमिडस्साठी तशाच भव्य शिळांचा वापर झाला आहे. या शिळा बांधकामाच्या ठिकाणी कशा आणल्या गेल्या याबाबत संशोधकांसह अनेकांना कुतूहल असते. इजिप्तमध्ये चार हजार वर्षांपूर्वीचे 31 पिरॅमिडस् नेमके कसे बांधण्यात आले असावेत, त्यामागचं कोडं वैज्ञानिकांनी उलगडलं आहे. इजिप्तमधल्या प्रसिद्ध गिझाचाही यात समावेश आहे. युनिव्हर्सिटी ऑफ नॉर्थ कॅरोलिना विल्मिंगटनमधील संशोधकांच्या टीमला या पिरॅमिडस्बद्दल काही महत्त्वाचे शोध लागले आहेत. नाईल नदीची एखादी पुरातन शाखा असावी आणि तिच्या किनार्‍यालगत हे पिरॅमिड बांधण्यात आले असावेत. पण आता नाईल नदीची ही शाखा लुप्त झाली असून, तिथे वाळवंट आणि शेतजमिनी आहेत, असा अंदाज संशोधकांच्या या टीमने संशोधनातून व्यक्त केला आहे.

पिरॅमिडचं बांधकाम करण्यासाठी प्रचंड मोठ्या आकाराच्या शिळांचा वापर करण्यात आला आहे. त्या शिळा वाहून आणण्यासाठी प्राचीन इजिप्शियन लोकांनी जवळपासच्या जलमार्गाचा वापर केला असावा, असा कयास अनेक वर्षांपासून पुरातत्त्व संशोधकांनी लावला होता. 'पण पिरॅमिडच्या प्रत्यक्ष बांधकामाच्या जागेपासून हा जलमार्ग किती अंतरावर असेल, नेमका कुठे असेल, किती मोठा असेल, याची कुणालाच माहिती नाही,' असं संशोधन करणारे प्राध्यापक इमान घोनिम यांनी लिहिलं आहे. या नवीन संशोधनासाठी विविध खंडांतील संशोधकांनी एकत्र येऊन काम केलं.

संशोधकांच्या या गटानं रडार सॅटेलाईट फोटो, इतिहासकालीन नकाशे, भौगोलिक सर्वेक्षण आणि पिरॅमिडच्या जागी गोळा करण्यात आलेल्या नमुन्यांमधून पुरावे शोधून, नदीच्या या शाखेचा प्रवाह कसा वाहत होता, याचा अंदाज लावला. हजारो वर्षांपूर्वी झालेलं धुळीचं वादळ आणि भयंकर दुष्काळ यांमुळं नदीची ही शाखा लोप पावली असावी, असा संशोधकांचा अंदाज आहे. रडार टेक्नॉलॉजीचा वापर करून या टीमनं, 'वाळूच्या पृष्ठभागातून खाली जाऊन आत दडलेल्या गोष्टींची छायाचित्रं काढली,' असं कम्युनिकेशन्स अर्थ अँड एन्व्हायरमेंट या अभ्यासपत्रात छापण्यात आलेल्या शोधनिबंधात म्हटलंय.

प्राध्यापक घोनिम यांच्या मते, 'यामध्ये काढण्यात आलेल्या छायाचित्रांत नद्या आणि पुरातन बांधकामांचा समावेश आहे. तसंच ज्या भागांत इजिप्तमधले पुरातन पिरॅमडस् आहेत, त्याच्याच पायथ्याशी या गोष्टी आढळल्या आहेत. नाईल नदीच्या लुप्त झालेल्या या शाखेला अहरामत शाखा म्हटलं जातं आहे. 'अहरामत' या अरेबिक शब्दाचा अर्थ 'पिरॅमिडस्' असा होतो. नाईल नदीची ही अहरामत शाखा 64 किलोमीटर लांब आणि 200 ते 700 मीटर रुंद होती. या शाखेच्या किनार्‍यावर 4700 ते 3700 वर्षांपूर्वी बांधण्यात आलेले इजिप्तमधले 31 पिरॅमिडस् आहेत. नदीच्या या लुप्त शाखेचा शोध लागल्यामुळं आता, गिझा ते लिश्त (मध्ययुगीन राजांना दफन करण्यात आलेली जागा) या भागामध्ये पिरॅमिडची संख्या आणि भव्यता याची कारणं शोधण्यासाठी मदत मिळू शकते.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news