लाकूड समजले; निघाला मॅमथचा दात! | पुढारी

लाकूड समजले; निघाला मॅमथचा दात!

वॉशिंग्टन ः सुमारे दोन वर्षांपूर्वी वैज्ञानिकांना कॅलिफोर्नियाच्या तटाजवळ एक विचित्र वस्तू आढळली. सकृतदर्शनी हा लाकडाचा तुकडा असावा असे त्यांना वाटले. वास्तवात हा प्रागैतिहासिक काळातील मॅमथ या केसाळ हत्तीचा तीन फूट लांबीचा दात होता. आता या दातावर नवे संशोधन करण्यात आले आहे.

मोंटेरे बे अ‍ॅक्वॅरियम रिसर्च इन्स्टिट्यूटच्या एका रिसर्च टीमने 2019 मध्ये समुद्राच्या पृष्ठभागापासून सुमारे 10 हजार फूट खोलीवरील एका सागरी डोंगरात हा दात शोधला. मिशिगन विद्यापीठाच्या डॅनियल फिशर या जीवाश्म संशोधकांनी म्हटले आहे की, यापूर्वीही मॅमथचे जीवाश्म समुद्रातून बाहेर काढण्यात आले आहेत. अशा वस्तू खोल समुद्रात सापडणे ही एक दुर्मीळ बाब आहे. कॅलिफोर्नियाजवळ आढळलेला हा दात एका युवा मादीचा आहे. ही कोलंबियन मॅमथ मादी लोअर पॅलिओलिथिक काळात वावरत होती. हा काळ दोन लाख वर्षांपूर्वीचा आहे.

या प्राण्याचे नेमके वय शोधण्याचा सध्या प्रयत्न सुरू आहे. शिवाय त्यांच्या जीवनाशी निगडीत अन्यही काही रहस्ये उलगडण्याचा प्रयत्न केला जात आहे. कॅलिफोर्निया युनिव्हर्सिटीच्या संशोधिका केटी मून यांनी सांगितले की केवळ जमिनीवरच नव्हे तर समुद्रात खोल ठिकाणीही प्राचीन प्राण्यांचे जीवाश्म असू शकते याचे हे एक महत्त्वाचे उदाहरण आहे.

हेही वाचलं का?

 

Back to top button