मुलाच्या फुफ्फुसात अकरा महिने होती शिट्टी!

पश्‍चिम बंगाल

कोलकाता : लहान मुलं कधी, कोणता उपद्व्याप करतील हे काही सांगता येत नाही. अनेक वेळा मुलं काहीबाही गिळत असतात आणि पालकांचाच जीव कंठाशी येत असतो. आता पश्‍चिम बंगाल मधील असाच एक धक्‍कादायक प्रकार समोर आला आहे. तेथील बारा वर्षांच्या एका मुलाच्या फुफ्फुसातून शिट्टी बाहेर काढण्यात आली आहे. ही शिट्टी त्याच्या फुफ्फुसांमध्ये तब्बल अकरा महिने होती हे विशेष!

पश्‍चिम बंगाल मधील कोलकत्याच्या सरकारी एसएसकेएम हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी ऑपरेशन करून ही शिट्टी बाहेर काढली. फुफ्फुसात शिट्टी अडकलेली असूनही तो अकरा महिने जिवंत राहिला हे विशेष! दक्षिण 24 परगणा जिल्ह्यातील बरुईपूरमध्ये राहत असलेल्या रेहान लस्कर याने जानेवारीमध्ये बटाट्याचे चिप्स खात असताना चुकून ही प्लास्टिकची शिट्टीही गिळली होती.

त्याने ही बाब आपल्या पालकांपासून लपवून ठेवली. शिट्टी गिळल्यानंतर ज्यावेळी मुलाने तोंड उघडण्याचा प्रयत्न केला त्यावेळी शिट्टीचा आवाज ऐकू येत होता. सुरुवातीला पालकांच्या लक्षात हे आले नाही. त्यानंतर वडिलांच्या लक्षात आले की रेहानच्या छातीत दुखते आणि श्‍वास घेतानाही त्रास होतो.

त्याला नॅशनल मेडिकल कॉलेज हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. तिथून त्याला एसएसकेएम हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले. डॉक्टरांनी मुलाचा एक्स-रे आणि सीटी स्कॅन केला. त्याच्या फुफ्फुसात शिट्टी अडकल्याचे दिसून आले. त्यानंतर मुलावर शस्त्रक्रिया करण्यात आली. डॉक्टरांनी सांगितले की ब्रॉन्कोस्कोपी केली व नंतर ऑप्टिकल फोर्सेप वापरून ही शिट्टी बाहेर काढण्यात आली.

Exit mobile version