लंडन : चीन व जपानसारख्या देशात रोबोविषयक तंत्रज्ञान वेगाने विकसित होत आहेत. साठा करणार्या गोदामांपासून संशोधन क्षेत्रातही याचा मोठ्या प्रमाणात वापर सुरू आहे. त्यातच कुशल कामगारांचा तुटवडा आणि जे कामगार आहेत, त्यांची वाढती मजुरी या समस्या वेगळ्या आहेतच. यावर मार्ग काढण्यासाठी युरोपियन देशांनी आता जपानच्या रोबोची मोठ्या प्रमाणात मदत घेण्यास सुरुवात केली आहे. यामुळे मजुरांच्या तुटवड्याचा प्रश्न तर मिटला आहेच. शिवाय, उत्पादकताही वाढली असल्याचे निरीक्षण नोंदवले गेले आहे.
मुळात युरोपियन कंपन्यांसमोर कुशल कामगार मिळवणे दिवसेंदिवस आव्हानात्मक होत चालले आहे. अगदी रोजच्या पातळीवर या आघाडीवर संघर्ष करत राहणे भाग असते. या परिस्थितीत अशा कंपन्या आता रोबोंकडून अनेक कामे करवून घेत आहेत. असे रोबो पेंटिंग, वेल्डिंग, गुणवत्ता परीक्षण आणि विषारी रसायने हाताळण्यासारख्या कामात सक्षम असतात, असे आजवर दिसून आले आहे.
जेनेरेटिव्ह आर्टिफिशियल इंटेलिजेन्सची जोड लाभलेले असे रोबो उत्पादकतेच्या आघाडीवरदेखील मोठी वृद्धी घडवून आणू शकतात. युरोपियन संघ कारखान्यात रोबो तैनात करण्याच्या निकषावर दुसर्या स्थानी आहे. जर्मनी, इटली व फ्रान्स ही याची मुख्य बाजारपेठ आहे. सर्वाधिक रोबो तैनात करण्याच्या यादीत सध्या चीन आघाडीवर असून यात भारत 11 व्या स्थानी आहे.
तसे पाहता जपानी रोबोटिक्स कंपन्यांसाठी चीन मोठी बाजारपेठ ठरत आला आहे. चीनमध्ये आर्थिक मंदी डोके वर काढत असताना जपानी रोबोंच्या मागणीतही घट झाली. पण, तरीही चीन या यादीत अव्वलस्थानी राहिला आहे.