GPS : जीपीएस ड्रॉईंगचा नवा विश्‍वविक्रम! | पुढारी

GPS : जीपीएस ड्रॉईंगचा नवा विश्‍वविक्रम!

लंडन ः

बि—टनमधील अँथोनी होयटे याला ‘पेडलिंग पिकासो’ म्हणून ओळखले जाते. एखाद्या सायकलपटूला पिकासो या ख्यातनाम चित्रकाराच्या नावाने ओळखले जाण्यामागेही एक कारण आहे. या सायकलपटूने नवी जीपीएस कलाकृती बनवून विश्‍वविक्रम केला आहे. हा सायकलपटू सायकलिंगच्या माध्यमातून जीपीएसवर निर्माण होणार्‍या ड्रॉ लाईनने कलाकृती साकार करण्याचा प्रयत्न करीत असतो.

अलीकडेच अँथोनीने सायकलिंग करीत मोठ्या मिशा असलेल्या माणसाचे चित्र जीपीएसच्या ड्रॉ लाईनने साकारले आहे. त्यासाठी त्याला बारा तासांचा वेळ लागला. सतत बारा तास सायकल चालवून त्याने हे सर्वात मोठे जीपीएस ड्रॉईंग तयार केले. आता त्याचे नाव गिनिज बुकमध्येही नोंदवले जाणार आहे. यापूर्वी त्याने जीपीएस ड्रॉईंगमधून स्नोमॅन, मांजर, काळवीट आणि अन्यही अनेक चित्रे साकारली आहेत. आता त्याने 107 किलोमीटरचे अंतर सायकलिंगने पार करीत मिशा असलेला हा माणूस साकारला. त्याला त्याने ‘मिस्टर मुवम्बर’ असे नाव दिले आहे. नोव्हेंबरमध्ये अनेक पाश्‍चात्त्य लोक मिशा वाढवत असतात. अँथोनीने 13 नोव्हेंबरला सायकलिंग करणे सुरू केले होते. त्याने अनेक अडथळे पार करून हे चित्र साकारले.

Back to top button