अल्झायमरमधील जैव-आण्विक तंत्राचा शोध | पुढारी

अल्झायमरमधील जैव-आण्विक तंत्राचा शोध

नवी दिल्‍ली : उतारवयात होणार्‍या विस्मरणाशी संबंधित मेंदूच्या आजारांमध्ये अल्झायमरचा समावेश होतो. या रोगातील विशिष्ट प्रोटिन समूहांच्या निर्मितीसाठी कारणीभूत असणार्‍या जैव-आण्विक तंत्राचा भारतीय संशोधकांनी शोध लावला आहे.

या संशोधकांना आढळले की एमिलॉयड प्रीकर्सर प्रोटिन (एपीपी) चे सिग्‍नल पेप्टाईड एमिलॉयड बीटा पेप्टाईडशी (एबीटा 42) संयुक्‍त रूपाने एकत्रीकरण होऊ शकते. या ‘एबीटा 42’ लाच अल्झायमरच्या उत्पत्तीचे कारण मानले जाते. अल्झायमर हे मनोभ—ंश किंवा डिमेन्शियाचे (विस्मृती) सामान्य रूप आहे. हा विकार हळूहळू स्मृती आणि अन्य महत्त्वपूर्ण मानसिक कार्यप्रणालीला बाधित करीत जातो. संशोधकांनी म्हटले आहे की पेशींच्या अंतर्गत जवळजवळ सर्व क्रियांसाठी प्रोटिनची आवश्यकता असते. मात्र, त्या जमा झाल्याने (अ‍ॅग्रीगेट) किंवा चुकीच्या पद्धतीने वळल्याने (मिसफोल्डिंग) हानिकारक प्रभाव निर्माण होऊ शकतात. याच कारणांमुळे होणारे 50 पेक्षाही अधिक आजार अस्तित्वात आहेत. त्याचे एक उदाहरण ‘अल्झायमर’ हा सुद्धा आहे. चेतापेशींच्या दरम्यान असलेल्या रिकाम्या जागांमध्ये एमाइलॉयड बीटा 42 (एबीटा 42) नावाच्या चुकीच्या पद्धतीने वळलेले पेप्टाईडस् एकत्र आल्याने अल्झायमर होतो.

एबीटा 42 हे एक असे पेप्टाईड आहे जे पूर्ण लांबीचे प्राटिन ‘एमाइलॉयड प्रीकर्सर प्रोटिन’ (एपीपी) मधून येते. आयआयटी मंडी येथील स्कूल ऑफ बेसिक सायन्सेजमधील संशोधक डॉ. रजनीश गिरी यांनी याबाबतचे संशोधन केले आहे. आयआयटी मंडी, इंग्लंडची केम्बि—ज युनिव्हर्सिटी आणि अमेरिकेतील साऊथ फ्लोरिडा युनिव्हर्सिटीच्या संशोधकांनी एकत्र येऊन ‘एपीपी’च्या सिग्‍नल पेप्टाईडच्या एकत्रीकरणाच्या पॅटर्नचा अभ्यास केला आहे.

Back to top button