सर्वात वेगवान इलेक्ट्रिक विमान! | पुढारी

सर्वात वेगवान इलेक्ट्रिक विमान!

लंडन : जगभर सध्या इलेक्ट्रिक वाहनांचे एक नवे युग सुरू होत आहे. अगदी विमानेही विजेवर चालणारी बनू लागली आहेत. आता तर जगातील एक दिग्गज कंपनी ‘रोल्स रॉयस’ने सर्वात वेगाने उडू शकणार्‍या इलेक्ट्रिक विमानाची निर्मिती केली आहे. हे इलेक्ट्रिक विमान ताशी 623 किलोमीटर वेगाने उडू शकते. या विमानाने सध्याचा ताशी 212 किलोमीटर वेगाचा इलेक्ट्रिक विमानाचा विक्रम मोडला आहे.

या विमानाचे नाव ‘स्प्रिट ऑफ इनोवेशन’ असे आहे. त्याच्या बॅटरीने 7500 स्मार्टफोन सहजपणे चार्ज करता येतील. या विमानाने नव्या चाचणीत सुमारे 3 किलोमीटरचे अंतर केवळ अकरा मिनिटांमध्ये पूर्ण केले. अशाप्रकारे रोल्स रॉयसच्या या विमानाने वेगाचा नवा विक्रम केला.

या विमानाने 202 सेकंदांमध्ये तीन हजार मीटरची उंचीही गाठली जी आधीच्या विक्रमापेक्षा 60 सेकंदाने कमी आहे. ही आकडेवारी आता पुष्टीसाठी एका आंतरराष्ट्रीय संस्थेकडे देण्यात आली आहे. रोल्स रॉयस कंपनीचे सीईओ वॉरेन ईस्ट यांनी सांगितले की विमानांना कार्बन मुक्त करण्यासाठीचे हे महत्त्वाचे पाऊल आहे.

‘जेट झीरो’ची संकल्पना अशी विमाने सार्थ करू शकतील. हे इलेक्ट्रिक विमान एकदा चार्ज केल्यावर अर्धा तास सहजपणे उड्डाण करू शकते. यापूर्वी सिमेन्सच्या इलेक्ट्रिक प्लेनने 2017 मध्ये ताशी 212 किलोमीटर वेगाचा विक्रम केला होता.

Back to top button