ऑस्ट्रेलिया : सोन्याचा समजून ठेवलेला दगड निघाला सोन्यापेक्षाही मौल्यवान! | पुढारी

ऑस्ट्रेलिया : सोन्याचा समजून ठेवलेला दगड निघाला सोन्यापेक्षाही मौल्यवान!

मेलबोर्न : ऑस्ट्रेलियात डेव्हीड होल नावाच्या व्यक्तीने सोन्याचे खनिज समजून एक दगड गेल्या अनेक वर्षांपासून आपल्या घरी लपवून ठेवला होता. बराच प्रयत्न करूनही त्याला या दगडात सोन्याचा अंश आहे की नाही हे समजू शकले नाही. अखेर त्याने मेलबोर्न म्युझियममध्ये तज्ज्ञांना हा दगड दाखवला. त्यांनी सांगितले की हा दगड सोन्यापेक्षाही मौल्यवान असून तो अंतराळातून पृथ्वीवर आलेला एक उल्कापिंड आहे.

ऑस्ट्रेलियात 2015 मध्ये ही उल्का डेव्हीडला मेलबोर्नजवळील रीजनल पार्कमध्ये सापडली होती. 19 व्या शतकात या परिसरात सोन्याचा अंश असलेले अनेक दगड वाहून आल्याचे म्हटले जाते. त्यामुळे आजही लोकांना तिथे सोने सापडण्याची आशा वाटत असते.

डेव्हीडलाही वाटले की हा चमकदार दगड सोन्याचाच असावा. त्याने हा दगड फोडून पाहण्याचाही व्यर्थ प्रयत्न करून पाहिला होता. अनेक वर्षे हा दगड त्याच्यासाठी एक रहस्यच बनून राहिला. त्यानंतर म्युझियमचे भूवैज्ञानिक डेरमोट हेन्री यांनी सांगितले की ही एक उल्का आहे.

ती कदाचित मंगळ आणि गुरू या ग्रहांदरम्यान असलेल्या ‘अ‍ॅस्टेरॉईड बेल्ट’मधून आलेली असावी. या उल्केचे वय 4.6 अब्ज वर्षांचे असू शकते. शंभर ते एक हजार वर्षांपूर्वी ती पृथ्वीवर कोसळली असावी. तिच्या अभ्यासातून अंतराळातील अनेक रहस्यांवर नवा प्रकाश पडू शकतो.

Back to top button